जिवावरची जोखीम घेऊन निवडणूक लढविण्यासाठी पाकिस्तानमध्ये परतलेले माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना पहिला ‘देशी’ झटका मिळाला आहे. पंजाब प्रांतातील कसूर येथील मतदारसंघातील त्यांचा उमेदवारी अर्ज शुक्रवारी नाकारण्यात आल्याचे वृत्त ‘डॉन’ने दिले आहे. त्यांच्या राष्ट्रीय ओळखपत्रावारील स्वाक्षरीशी उमेदवारी अर्जातील स्वाक्षरी जुळत नसल्याचे कारण दाखवीत हा अर्ज फेटाळण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जावेद कसुरी या वकिलाने मुशर्रफ यांच्या उमेदवारीवर  संविधानातील ६२/६३ कलमानुसार आक्षेप घेतला होता. या कलमांत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे चारित्र्य चांगले असावे, भ्रष्टाचारापासून लांब असलेल्या व्यक्तीने निवडणूक लढवावी, असे म्हटले आहे. मुशर्रफ कराची, इस्लामाबाद, चित्रल आणि कसूर येथून निवडणूक लढवीत आहेत. इस्लामाबाद येथेही त्यांच्या उमेदवारीबाबत आक्षेप घेणारा अर्ज दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान भ्रष्टाचाराच्या विविध प्रकणांवर त्यांच्यावर चालविल्या जाणाऱ्या खटल्याबाबत सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्यांची निवडणूक उमेदवारी रद्द करण्यासाठी पाकिस्तानी वकिलांची फळी कार्यरत झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.  

एका मतदारसंघातील उमेदवारी  अर्ज फेटाळला
मुशर्रफ मुख्य स्पर्धक नसतील?
वॉशिंग्टन : येत्या मेमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका जिंकून पुन्हा एकदा पाकिस्तानची सत्ता हस्तगत करण्याचे मनसुबे रचणाऱ्या परवेज मुशर्रफ यांना या निवडणुकीत फारसे यश मिळणार नाही, असे भाकीत एका अमेरिकी तज्ज्ञाने वर्तविले आहे. मुशर्रफ यांच्या पक्षाला हाताच्या बोटावर मोजण्याएवढय़ाच जागा मिळतील, दुसरीकडे त्यांच्या सुरक्षेला मात्र मोठा धोका आहे, असे या तज्ज्ञाने म्हटले आहे.  डॅनियल मर्की यांनी हे भाकीत केले आहे. पाकिस्तानच्या भूतकाळाचा विचार केला तर ते नि:संशय मोठे नेते होते, मात्र सध्या तशी परिस्थिती नाही. सद्यस्थितीत त्यांच्या पक्षाचे अस्तित्वच कोठे नाही, शिवाय त्यांच्यावर अनेक खटले सुरू आहेत, त्यांनी अनेक शत्रूही निर्माण केले आहेत, त्यामुळे त्यांनी निवडणुकीचा विचार करण्यापेक्षा स्वत:च्या सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे मर्की म्हणाले.

Story img Loader