भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध भारत स्वतंत्र झाल्यापासून आजतागायत सुधरू शकलेले नाहीत. सीमेपलीकडून वारंवार होत असलेल्या घुसखोरीच्या कारवाया आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन यामुळे दोन्ही देशांमधले संबंध कायम तणावपूर्ण राहिले आहेत. मात्र, आता या सगळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSS ची विचारसरणी आडवी आल्याचा खळबळजनक दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. दक्षिण-मध्य आशिया परिषदेसाठी इम्रान खान सध्या उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे दाखल झाले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना इम्रान खान यांनी दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांचं खापर आरएसएसवर फोडलं आहे.
#WATCH Pakistan PM Imran Khan answers ANI question, ‘can talks and terror go hand in hand?’. Later he evades the question on whether Pakistan is controlling the Taliban.
Khan is participating in the Central-South Asia conference, in Tashkent, Uzbekistan pic.twitter.com/TYvDO8qTxk
— ANI (@ANI) July 16, 2021
“चर्चा आणि दहशतवाद सोबत चालू शकतात का?” असा सवाल पत्रकारांनी इम्रान खान यांना पत्रकारांनी विचारला. हा प्रश्न थेट भारताकडून विचारला जात असल्याचं एएनआयच्या प्रतिनिधींनी इम्रान खान यांना सांगितलं. त्यावर उत्तर देताना त्यांनी या सगळ्यासाठी आरएसएसची विचारसरणी जबाबदार असल्याचं उत्तर दिलं. “भारताला आम्ही सांगू शकतो की गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही वाट पाहतोय सभ्य शेजारी बनून राहण्याची. पण काय करणार, आरएसएसची विचारसरणी मध्ये आली”, असं वक्तव्य इम्रान खान यांनी केलं आहे. त्यांच्या या भूमिकेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद तर उमटतीलच, मात्र त्यासोबतच भारतात देखील त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.
इम्रान खान याआधी म्हणाले होते…!
इम्रान खान यांनी काश्मीरमधील परिस्थितीच्या संदर्भात बोलणी सुरू करण्याबाबत वक्तव्य केलं होतं. गेल्याच महिन्यात इम्रान खान म्हमाले होते, “जर भार काश्मीरमध्ये आधीसारखी परिस्थिती लागू करण्यासाठी (कलम ३७०) धोरण आखत असेल, तर आम्ही भारतासोबत चर्चा करण्यास तयार आहोत. भारतानं पाकिस्तानला सांगावं की त्यांनी काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काय पावलं उचलली आहेत. काश्मीरचा विशेष दर्जा संपवणं हे आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या नियमांचं उल्लंघन आहे.”