पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. पाकिस्तानमध्ये पुरामुळे मोठं संकट आलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पुरामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तान भीषण संकटाचा सामना करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला होता. यानंतर शाहबाज शरीफ यांनी त्यांचे आभार मानले असून, आपला देश या संकटावर मात करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे पुराचं संकट निर्माण झालेलं असून, ११०० लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय तब्बल तीन कोटींहून अधिक नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
मोदींनी काय ट्विट केलं होतं –
पाकिस्तानमधील पूरस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. “पाकिस्तानमध्ये पुरामुळे झालेली स्थिती पाहून दुःख झाले. या नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या सर्वांच्या कुटुंबीयांप्रती आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि लवकरात लवकर परिस्थिती पूर्वपदावर येण्याची आशा करतो,” असं मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मानले आभार
“भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पाकिस्तानमधील नागरिक आपल्या प्रयत्नांनी या नैसर्गिक संकटावर मात, पुन्हा एकदा आपलं जीवन सुरळीत करतील,” असं पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे.
अभूतपूर्व पुराचा सामना करणारा पाकिस्तान रोखीनेही त्रस्त आहे. पाकिस्तानने या अनपेक्षित संकटावर मात करण्यासाठी संयुक्त राष्ट्राकडे मदत मागितली आहे.