पठाणकोट हवाई दलाच्या तळावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्यासाठी पाकिस्तानचे पथक भारतात आले असून ते गुरुवारपासून साक्षीदारांचे आणि पंजाबच्या पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचा जबाब नोंदविणार आहे.
दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अझर आणि त्याचा भाऊ असद रौफ यांच्या आवाजाचे नमुने देण्याची मागणी पाकिस्तानकडे केली आहे. इतकेच नव्हे तर या दहशतवादी संघटनेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या ट्रस्टबाबतही सविस्तर माहिती देण्यास सांगितले आहे.
एनआयए आणि पाकिस्तानच्या पथकात झालेल्या चर्चेच्या वेळी एनआयएने पथकातील अधिकाऱ्यांना ३०० प्रश्न असलेली यादी सुपूर्द केली. मौलाना मसूद अझर, त्याचा भाऊ रौफ यांच्या, त्याचप्रमाणे पठाणकोट हल्ल्यात ठार झालेला दहशतवादी नासीर याची आई खय्याम बाबर हिच्या आवाजाचे नमुने देण्याची मागणीही केल्याचे एनआयएचे प्रमुख शरदकुमार यांनी सांगितले.
हल्ल्याच्या वेळी नासीरने त्याच्या आईशी बातचीत केली होती, असे सांगण्यात येत आहे. एनआयएने अझर आणि रौफ यांची चौकशी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
पाकिस्तानचे पथक आजपासून साक्षीदारांची जबानी नोंदविणार
पठाणकोट हवाई दलाच्या तळावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्यासाठी पाकिस्तानचे पथक भारतात आले
First published on: 31-03-2016 at 03:16 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan probe team reaches pathankot air base