पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येचा खटला आणि २६/११ च्या मुंबई हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या खटल्यातील ज्येष्ठ सरकारी वकील चौधरी झुल्फिकार अली यांची शुक्रवारी सकाळी अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली.
कराची कंपनी या वर्दळीच्या भागात शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. अली आपल्या कारमधून निघाले होते. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. गोळी लागल्यामुळे चौधरी यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि ती रस्ता ओलांडणाऱया एका महिलेला जाऊन धडकली. यामध्ये संबंधित महिलेचाही मृत्यू झाला. हल्ल्यामध्ये अली यांचे सुरक्षारक्षक जखमी झाले.
गोळीबारानंतर अली यांना तातडीने पाकिस्तान आयुर्विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अली यांना विविध ठिकाणी गोळ्या लागल्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. गोळीबारानंतर हल्लेखोर पळून गेले असून, अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
अली यांना दहशतवादी संघटनांकडून धमक्यांचे कॉल येत होते, अशी माहिती त्यांच्या मुलाने पाकिस्तानातील वृत्तवाहिनीला दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा