Pakistani Beggars in Saudi Arabia : पाकिस्तान गेल्या अनेक दशकांपासून दहशतवाद, मानवी तस्करी, अंमली पदार्थांची तस्करी, सायबर गुन्हेगारी आणि भिकाऱ्यांच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे अलीकडेच मध्य पूर्वेतील अनेक देशांनी, प्रामुख्याने आखाती देशांनी इस्लामाबादला इशारा दिला होता की त्यांनी भिकाऱ्यांची निर्यात थांबवली नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या इशाऱ्यानंतर इस्लामाबादनेही जगभरातील आपली थट्टा थांबवण्यासाठी कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी सरकारने त्यांच्या देशातील ४,३०० भिकाऱ्यांना एक्झिट कंट्रोल लिस्टमध्ये (ईसीएल) टाकलं आहे. म्हणजेच त्यांना नो फ्लाय लिस्टमध्ये टाकलं आहे. जेणेकरून हे भिकारी देशाबाहेर जाऊ नयेत. पाकिस्तान सोडून सौदी अरब गाठणं हे या भिकाऱ्यांचं प्रमुख लक्ष्य असतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सौदी अरबने त्यांच्या देशातील वाढत्या भिकाऱ्यांमुळे (जे पाकिस्तानमधून तिकडे गेले आहेत) चिंता व्यक्त केली होती. हज आणि उमराह व्हिसाचा दुरुपयोग करून हे भिकारी मक्का व मदीना या शहरांमध्ये भीक मागायला जातात. तिकडेच कायमचं वास्तव्य करतात. त्यामुळे सौदी अरबने चिंता व्यक्त केली होती. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन रझा नख्वी यांनी बुधवारी सौदी अरबचे मंत्री नासेर बिन अब्दुलअजीज अल दाऊद यांना भिकारी निर्यात करणाऱ्या टोळ्या व माफियांविरोधात पाकिस्तानने उचललेल्या पावलांची माहिती दिली. तसेच, “आम्ही देखील आमच्या देशातून होणारी अशा प्रकारची निर्यात बिलकूल खपवून घेणार नाही”, असंही नख्वी यांनी सांगितलं.

हे ही वाचा >> मोठी बातमी! भाजपा २० खासदारांना बजावणार नोटीस; नेमकं कारण काय?

सौदी अरबने दिलेला इशारा

धार्मिक तीर्थयात्रेच्या नावाखाली येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांच्या वाढत्या संख्येबाबत सौदी अरेबियाने दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानला इशारावजा धमकी दिली होती. “तुमचे नागरिक धार्मिक तीर्थयात्रेच्या नावाखाली आमच्या देशात येतात आणि नंतर भीक मागतात”, असं सांगत सौदीच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला त्या नागरिकांना थांबवण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचं आवाहन केलं होतं. “पाकिस्तानने यावर उचित कारवाई न केल्यास पाकिस्तानी उमराह आणि हज यात्रेकरूंवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात”, असा इशारा सौदी अरेबियाने दिला होता. त्यानंतर आता पाकिस्तानने भिकाऱ्यांची निर्यात थांबवली आहे.

हे ही वाचा >> भाजपशासित राज्यांत समान नागरी कायदा; राज्यसभेत संविधानावरील चर्चेत अमित शहा यांची घोषणा

परदेशात अटक केलेले ९० टक्के भिकारी पाकिस्तानी

दोन महिन्यांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार परदेशात अटक करण्यात आलेले ९० टक्के भिकारी हे पाकिस्तानातून येत असल्याचे समोर आलं होतं. सौदी अरब आणि इराक या दोन देशांनी पाकिस्तानातून येणाऱ्या भिकाऱ्यांमुळे चिंता व्यक्त केल्यामुळे ही समस्या अधिक ठळक झाली आहे. पाकिस्तानमधील आघाडीचं वृत्तपत्र असलेल्या डॉनने अलीकडेच यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये म्हटलं होतं की परदेशात अटक करण्यात आलेल्या भिकाऱ्यांपैकी ९० टक्के भिकारी हे एकट्या पाकिस्तानातील आहेत. दरम्यान, पाकिस्तानी संसदेच्या स्थायी समितीला सांगण्यात आलं होतं की, पाकिस्तान सोडून जाणाऱ्या लोकांपैकी सर्वाधिक भिकारीच आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव झुल्फिकार हैदर यांनी कुशल व अकुशल कामगार देश सोडून जात असल्याची आकडेवारी संसदेत देत असताना भिकाऱ्यांसंदर्भातील आकडेवारी जाहीर केली होती. हैदर म्हणाले, सौदी अरबमध्ये सध्या ३० लाख पाकिस्तानी आहेत, यूएईमध्ये १५ लाख आणि कतारमध्ये दोन लाख पाकिस्तानी नागरिक आहेत. या तीन देशांमध्ये गेलेले हजारो पाकिस्तानी तिथल्या रस्त्यांवर, मशिदींबाहेर भीक मागतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan puts 4300 beggars in no fly list after warning from middle east saudi arabia asc