गेल्या महिन्यात झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे पाकिस्तानातील अनेक जगविख्यात ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान झाल्याची माहिती पुरातत्त्व तज्ज्ञांनी दिली आहे.
या भूकंपाचा सर्वात मोठा फटका विविध संग्रहालये आणि गांधार संस्कृतीचा वारसा असणाऱ्या तख्त भाई आणि खैबर पखतुनख्वा परिसराला बसला असून यात सुमारे २५० हून अधिक लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. विनाशकारी भूकंपाने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील या ऐतिहासिक वास्तूंना झालेल्या नुकसानीमुळेच मोठय़ा प्रमाणात जीवहानीदेखील झाल्याची पुष्टी ‘डॉन’ या वृत्तसंस्थेने केली आहे, तर या नुकसानीचा आढावा लवकरच घेण्यात येईल, असे खैबर पखतुनख्वाच्या पुरातत्त्व आणि संग्राहलय संचालक अब्दुल समद यांनी सांगितले.
पेशावर, दिर आणि स्वात या परिसरातील वस्तुसंग्रहालयांनाही भूकंपाचा फटका बसला असून असेंब्लीच्या मुख्य सभागृहाच्या भिंतीलाही तडा गेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. १८४८ साली सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी शोधलेल्या मारदान जिल्ह्य़ातील बौद्ध संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या जमाल गढी या वास्तूचेही अतोनात नुकसान झाल्याची माहिती समद यांनी दिली. जागतिक वारशाचा दर्जा असलेल्या खानपूर येथील वास्तूचेही भूकंपाच्या तीव्र झटक्यामुळे अतोनात नुकसान झाले. याशिवाय शहरातील बहुतांश पुरातन वास्तू या विनाशकारी भूकंपाच्या बळी ठरल्या आहेत. ऐतिहासिक पेशावर शहर या नैसर्गिक आपत्तीने हादरून गेले आहे.

Story img Loader