पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या भारतीय वैमानिक अभिनंदन यांची सुटका कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ही घोषणा केली आहे. संसदेत बोलताना इम्रान खान यांनी शांततेसाठी आपण भारतीय वैमानिकाची सुटका करत असल्याचं सांगितलं. आज दुपारपर्यंत वाघा बॉर्डरच्या मार्गे अभिनंदन भारतात परतणार असल्याची माहिती आहे. अभिनंदन यांची सुटका करत तात्काळ भारतात पाठवण्यात यावं अशी मागणी भारताकडून कऱण्यात आली होती. कोणतीही चर्चा न करता पाकिस्तानने आमच्या वैमानिकाला भारतामध्ये पाठवावे अशी कठोर भूमिका भारताने घेतली होती.
Pakistan Prime Minister Imran Khan: As a peace gesture we are releasing Wing Commander Abhinandan tomorrow. pic.twitter.com/J0Attb6KDC
आणखी वाचा— ANI (@ANI) February 28, 2019
१४ फेब्रुवारीला जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला केला होता. यामध्ये ४० जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. भारताने या हल्ल्याचं प्रत्युत्तर देत एअर स्ट्राइक करत पाकिस्तानच्या बालाकोट येथे जैश-ए-मोहम्मदच्या ३०० दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं होतं. यानंतर दुसऱ्याच दिवशी २७ फेब्रुवारीला पाकिस्तानने विमानांसहित भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. पण भारताने त्यांची विमानं परतवून लावली. भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले होते, मात्र त्यावेळी आपले मिग २१ विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळलं होतं. यावेळी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं होतं. यानंतर त्यांच्या सुटकेसाठी भारताकडून प्रयत्न सुरु झाले होते.
‘मुलगा सुखरुप यावा हीच प्रार्थना’
विंग कमांडर अभिनंदन यांच्या वडिलांनी मुलाला पाठिंबा आणि शुभेच्छा दिल्याबद्दल देशावासीयांचे आभार मानले आहेत. त्यांनी एक संदेश जारी केला होता. अभिनंदनचे वडील सिमहाकुट्टी वर्थमान हे एअर मार्शल पदावर कार्यरत होते. त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं होतं की, ‘तुमच्या काळजी आणि शुभेच्छांसाठी आभार. देवाने आमच्यावर कृपादृष्टी ठेवली आहे त्याबद्दल आभार…माझा मुलगा जिवंत आहे, जखमी नाही, व्यवस्थित आहे…किती धैर्याने तो बोलत आहे…एका खरा जवान…आम्हाला त्याचा अभिमान आहे’.
‘अभिनंदन सुखरुप घरी परत यावा यासाठी तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा त्याच्यासोबत असतील याची खात्री आहे. त्याच्यावर अत्याचार होऊ नयेत यासाठी प्रार्थना. मनाने आणि शरिराने तो सुखरुप घऱी परत यावा यासाठीही प्रार्थना’, असं पुढे त्यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी गरजेच्या वेळी सर्वांनी सोबत दिल्याबद्दल आभार मानले. तुमच्या पाठिंब्यामुळे आम्हाला बळ मिळत असल्याचंही ते म्हणाले.