‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटामुळे सध्या देशभरातलं राजकारण ढवळून निघालं आहे. या चित्रपटामुळे काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावर चर्चा, वादविवादांना सुरूवात झाली आहे. सत्ताधारी तसंच विरोधी पक्षांनी या चित्रपटावरून टीकाटिप्पण्या करण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनीही या चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे.
गुलाम नबी आझाद यांनी जम्मू काश्मीरमध्ये जे झालं त्याला पाकिस्तान आणि दहशतवादाला जबाबदार धरलं आहे. जम्मूमध्ये बोलताना गुलाम नबी आझाद म्हणाले, “मला वाटतं की महात्मा गांधी हे एक महान हिंदू आणि धर्मनिरपेक्षतावादी व्यक्तिमत्तव होते. जम्मू काश्मीरमध्ये जे झालं त्याला पाकिस्तान आणि दहशतवाद जबाबदार होता. त्यामुळे सर्वच हिंदू, काश्मिरी पंडित, काश्मिरी मुस्लीम आणि डोग्रा जमातीलाही कष्ट भोगावे लागले. “
विवेक अग्निहोत्री यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटामुळे देशाच्या राजकारणात गदारोळ माजला आहे. याबद्दलही आझाद यांनी भाष्य केलं आहे. धर्म, जात आणि इतर गोष्टींच्या आधारे समाजाचं विभाजन करण्यासाठी राजकीय पक्ष सतत प्रयत्न करत असतात. मी माझ्या पक्षासह इतर कोणत्याही पक्षाला माफ करणार नाही. समाज एकत्र राहायला हवा. जात आणि धर्म न पाहता प्रत्येकाला न्याय मिळायला हवा, असं मत आझाद यांनी व्यक्त केलं आहे.