क्वेट्टा भागात झालेल्या सुमारे १०० शियांच्या हत्याकांडाच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांनी बलुचिस्तान सरकार बरखास्त केले असून तेथे राज्यपालांची राजवट लागू केली आहे. या नृशंस हत्याकांडाचा निषेध या भागात राहणाऱ्या जनतेकडून करण्यात येत होता.
गेल्या गुरुवारी एका शक्तिशाली स्फोटाद्वारे ९८ शिया पंथीयांची हत्या करण्यात आली होती, तसेच या स्फोटामध्ये १२० जण जखमी झाले होते. हत्या करण्यात आलेल्या शियांच्या मृतदेहांसह हजारो शिया पंथीय निषेध मोर्चामध्ये सामील झाले होते. जोपर्यंत बलुचिस्तान सरकार बरखास्त केले जात नाही तोपर्यंत मृतदेहांचा दफनविधी करण्यास आंदोलनकर्त्यांनी ठाम नकार दिला.
या सर्व पाश्र्वभूमीवर बैठकीत पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांनी बलुचिस्तान सरकार बरखास्तीचा निर्णय घेतला.