विनाशकारी भूकंप येऊन गेल्यानंतर नेपाळमधील लाखो लोक उपाशी असून जगण्यासाठी धडपड करत आहेत. त्यांच्यासाठी जगभरातून मदतसामग्री येऊन पोहोचत आहे. पाकिस्ताननेही भूकंपग्रस्तांसाठी अन्नाची पाकिटे पाठवली आहेत, पण त्यांना कुणीही हात लावत नाही. याचे काय कारण असावे?
पाकिस्तानने खाण्यासाठी तयार असलेली (रेडी टू इट) जी पाकिटे पाठवली आहेत, त्यामध्ये ‘बीफ मसाला’च्या पाकिटांचाही समावेश आहे. पाकिस्तानच्या या ‘मदती’मुळे हिंदू राष्ट्र असलेल्या नेपाळला धक्का बसला आहे. प्रसारमाध्यमांनी याबाबत ओरड केल्यानंतर, आपण पाठवलेला हा माल नेपाळमधील ‘अ-हिंदू’ समुदायासाठी असून, तशी सूचना फूड पॅकेट्सच्या लेबल्सवर लिहिली असल्याचे खुळचट स्पष्टीकरण पाकिस्तानी पंतप्रधानांच्या कार्यालयाने जारी केले आहे.
नेपाळमध्ये गायी पवित्र मानल्या जातात. गायींच्या हत्येवर येथे कठोर बंदी असून त्यासाठी १२ वर्षांच्या कैदेची शिक्षा आहे. १९९० पूर्वी तर या गुन्ह्य़ासाठी मृत्युदंडाचीच तरतूद होती. २०११ सालच्या जनगणनेनुसार नेपाळमधील ८४ टक्के लोकसंख्या हिंदू, तर १० टक्के बौद्ध होती. याचाच अर्थ, जवळजवळ ९५ टक्के लोकांसाठी गोमांस निषिद्ध आहे. त्यामुळे काही जणांच्या मते पाकिस्तानने नेपाळला गोमांस पाठवणे ही भावनाहीनता आहे, तर काही जणांच्या मते हा खोडसाळपणा आहे.
‘डेली मेल’ या वृत्तपत्रातील बातमीनुसार, भारतीय डॉक्टरांच्या एका चमूला सर्वप्रथम पाकिस्तानी मदतीतील या सामग्रीचा शोध लागला व त्यांनी याबाबत अधिकाऱ्यांना सतर्क केले. हा मुद्दा नेपाळ व पाकिस्तानमधील राजनैतिक भांडणाचे कारण ठरू शकतो, असे या बातमीत म्हटले आहे. या प्रकरणाची माहिती पंतप्रधान सुशीलकुमार कोईराला व गुप्तचर प्रमुखांना देण्यात आली आहे.
आम्ही वस्तुस्थिती पडताळून पाहण्याकरिता अंतर्गत चौकशी करत आहोत. जर हा अहवाल खरा असेल तर आम्ही तो पाकिस्तानसोबत राजनैतिक स्तरावर उपस्थित करू. भारत हा आमचा महत्त्वाचा भागीदार असल्यामुळे त्यालाही या घडामोडीची माहिती दिली जाईल, असे या वृत्तपत्राने एका नेपाळी अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे.
यापूर्वी, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने नेपाळमध्ये बीफ मसाल्याची पाकिटे पाठवण्यात आल्याच्या वृत्ताचे खंडन केले होते. रेडी टू इट पाकिटांमध्ये गोमांस नसल्याचे मंत्रालयाच्या प्रवक्त्या तस्नीम अहमद यांनी म्हटल्याचे पाकिस्तानच्या ‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’ या वृत्तपत्राने म्हटले होते. भारतीय प्रसारमाध्यमांनी पाकिस्तानला ‘बदनाम’ न करण्याचे आवाहन करतानाच, नेपाळच्या लोकांना हे अन्न ‘खरोखरच आवडले’ असून त्यांनी अशा आणखी पाकिटांची मागणी केली असल्याचे तस्नीम म्हणाल्या होत्या.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या मुद्दय़ावर पाकिस्तानवर कठोर टीका केली असून या प्रकाराला ‘अतिशय संवेदनाहीन’ म्हटले आहे. योगगुरू बाबा रामदेव यांनीही नेपाळसारख्या हिंदू राष्ट्राला मदत म्हणून गोमांस पाठवण्यामागील पाकिस्तानच्या हेतूबाबत शंका व्यक्त केली असल्याचे एका बातमीत म्हटले आहे.
शरीफ यांची भूकंपबळींबाबत सहानुभूती
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून भूकंपात मरण पावलेल्या भारतीयांबाबत सहानुभूती व्यक्त केली.
‘नवाझ शरीफ यांनी मला दूरध्वनी केला होता. भूकंपामुळे भारताच्या निरनिराळ्या भागात जी जीवहानी झाली, त्याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले’, असे मोदी यांनी ट्विटरवर सांगितले. नेपाळमधील बचावकार्यात भारताने केलेल्या प्रयत्नांची शरीफ यांनी प्रशंसा केली, तेव्हा मोदी यांनी याबाबत त्यांचे आभार मानले. आपत्तीच्या प्रसंगात मदत व बचावकार्यासाठी ‘सार्क’ देशांनी नियमितपणे संयुक्त कवायती करायला हव्यात, असे या संभाषणादरम्यान आपण शरीफ यांना सुचवले. शरीफ यांनी या कल्पनेचे स्वागत केले आणि आपण यासाठी पुढाकार घ्यायला हवा असे सांगितल्याचेही मोदी म्हणाले.