नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने यावेळेस तालिबानचं तोंडभरुन कौतुक करताना तालिबानी राजवटीचं खुलं समर्थन केलंय. तालिबानसंदर्भात आफ्रिदीने केलेलं वक्तव्य सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबान एका चांगल्या विचाराने सत्तेत आलं आहे, असं आफ्रिदी म्हणाला आहे. १६ ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी असणाऱ्या काबूलवर कब्जा मिळवत सत्ता ताब्यात घेतली. त्यानंतर तेथे उडालेला गोंधळ आणि घटनाक्रम संपूर्ण जगाने पाहिला. असं असतानाच आता आफ्रिदी मात्र तालिबान्यांच्या समर्थनार्थ शाब्दिंक बॅटींग करत असल्याचं दिसत आहे.

नक्की वाचा >> एक फोटो आणि नाव… जगाला एवढीच ओळख असणारा ‘तालिबान’चा म्होरक्या आणि त्याच्याबद्दलचं गूढ

आफ्रिदीने तालिबान एका साकारात्मक विचारसणीने सत्तेत आले आहेत असं सांगताना ‘ते जबरदस्त पॉझिटीव्हिटी घेऊन आले आहेत’ असे शब्द वापरले आहेत. तसेच, “ते महिलांना काम करण्याची परवानगी देत आहेत. राजकारण, नोकऱ्यांमध्ये महिलांना परवानगी देण्यासंदर्भात मला विश्वास आहे की तालिबानला क्रिकेट फार आवडतं, असं आफ्रिदीने म्हटलं आहे. आफ्रिदीचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं असून अनेकांनी पाकिस्तानच्या या माजी कर्णधाराने अकलीचे तारे तोडल्याची खोचक टीका केलीय. सध्या या व्हिडीओमुळे आफ्रिदी चांगलाच ट्रोल होतानाचं चित्र दिसत आहे.

नक्की वाचा >> “तालिबान अफगाणिस्तानमधील भारतीयांना लक्ष्य करणार नाही कारण त्यांना माहितीय, मोदीजी…”

अनेकांनी आफ्रिदीला त्याच्या या वक्तव्यासाठी ट्रोल केलं आहे. काहींनी त्याला महिला सशक्तीकरणाचा धडा जगाने आफ्रिदीकडून घ्यावा असा टोला लगावला आहे. काहींनी त्याला तालिबानचा प्रवक्ता असं म्हणत टोला लगावला आहे तर काहींनी त्याला खोचक टोला लगावताना थेट तालिबानचा पुढचा पंतप्रधान म्हणून संबोधलं आहे.

नक्की वाचा >> काश्मीर प्रश्नी तालिबान करणार पाकिस्तानला मदत?; पाकिस्तानमधील सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचा धक्कादायक दावा

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी यापूर्वीच अफगाणिस्तानमधील तालिबानी सत्तेचं स्वागत केलं आहे. “गुलामगिरीच्या जोखडातून तालिबानची सुटका झाली. जेव्हा आपण दुसऱ्यांची संस्कृती आत्मसात करतो तेव्हा आपण मानसिकरित्या गुलाम होतो. सांस्कृतिक गुलामगिरीतून बाहेर येणं सोपं नसतं. अफगाणिस्तानात आता जे काही होत आहे. ते गुलामगिरीच्या साखळ्या तोडण्यासारखं आहे.”, असं विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यावर केलं होतं.

अफगाणिस्तानात तालिबानचं राज्य प्रस्थापित झाल्याने अमेरिका, ब्रिटेन, उत्तर कोरिया, ऑस्ट्रेलियासहित अनेक देशांनी आपली दूतावास बंद केले आहेत. अमेरिकेने ९/११ हल्ल्यासाठी अल कायदाला जबाबदार धरलं होतं. यासाठी अमेरिकेने २००१ मध्ये अफगाणिस्तानवर हल्ला केला होता. अफगाणिस्तानवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेनं तालिबानला बाहेर केलं. त्यानंतर देशाच्या सुरक्षेसाठी अफगान सुरक्षा दल आणि पोलिसांना प्रशिक्षण दिलं. अमेरिकेने गेल्या २० वर्षातील युद्धात २० खरब डॉलर खर्च केले आणि २,३१२ सैनिक शहीद झाले आहेत. अमेरिकन लष्कराच्या सैनिकांची शेवटची तुकडी काल (३० ऑगस्ट २०२१ रोजी) दुपारी ३ वाजून २९ मिनिटांनी (अमेरिकन वेळेप्रमाणे) अफगाणिस्तानमधून रवाना झालेल्या सी -१७ विमानामधून मायदेशी परतलेत.

Story img Loader