बिहार या एकेकाळी अविकसित असलेल्या राज्याचा कायापालट तेथील विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ज्या पद्धतीने घडवून आणला ते पाहता, पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष असफ अली झरदारी यांनी त्यांच्याकडून धडे घ्यावेत आणि पाकिस्तानला विकासाभिमुख करावे, असा घरचा आहेर पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव रियाझ खोखर यांनी दिला.
१९९२ ते १९९७ या कालावधीत खोखर हे पाकिस्तानचे भारतातील दूत होते. पाकिस्तानातील आघाडीचा विचारमंच असणाऱ्या इन्स्टिटय़ूट ऑफ स्ट्रॅटॅजिक स्टडिज इस्लामाबाद येथे ‘बिहारच्या विकासाच्या कथा’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. याप्रसंगी नितीश कुमारही उपस्थित होते.
बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी कायदा आणि सुव्यवस्था तळागाळापर्यंत रुजविण्यासाठी जी कठोर पावले उचलली त्याची यादीच या परिसंवादात सादर केली. या वेळी सुशासन हा सामान्य जनतेचा हक्क असल्याने तो हक्क देणारा कायदा बिहार सरकारने संमत केल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले. विशेष म्हणजे मूळ भाषण इंग्रजीमध्ये असतानाही नितीश कुमार यांनी उत्स्फूर्तपणे हिंदीत भाषण केले.
बिहारच्या विकासामागील भूमिका, त्यामागील नियोजन आणि विकासाची आकडेवारी नितीश कुमार यांनी सादर केली. आपणही विकासाच्या प्रक्रियेचा भाग होऊ शकतो हा विश्वास आपल्या सरकारने जनता आणि नोकरशाहीच्या मनात निर्माण केल्याचे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून नमूद केले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध दृढ होण्यासाठी विविध क्षेत्रांत सहकार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
नितीश कुमार यांच्या भाषणानंतर बोलताना रियाझ खोखर यांनी पाकिस्तानची सद्यस्थिती आणि ढासळती कायदा-सुव्यवस्था यांबद्दल काळजी व्यक्त केली.
ती व्यक्त करताना, पाक राष्ट्राध्यक्ष झरदारी यांनी बिहारी मुख्यमंत्र्यांकडून कायदा-सुव्यवस्थेचे धडे घ्यावेत, अशी कोपरखळी खोखर यांनी मारली. यावर उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली.
पाकिस्तानने बिहारकडून विकासाचे धडे घ्यावेत
बिहार या एकेकाळी अविकसित असलेल्या राज्याचा कायापालट तेथील विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ज्या पद्धतीने घडवून आणला ते पाहता, पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष असफ अली झरदारी यांनी त्यांच्याकडून धडे घ्यावेत आणि पाकिस्तानला विकासाभिमुख करावे,
First published on: 14-11-2012 at 02:20 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan should learn devolpment from the bihar