अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होताच देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला. अनेक मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले, अनेक ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. देशात एक आनंदाचे वातावरण तयार झालेले पाहायला मिळाले. मात्र आपल्या शेजारी राष्ट्राला ही बाब रुचलेली नाही. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या काही तासांनंतर पाकिस्तानने या सोहळ्याचा निषेध केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एक्सवर प्रसिद्धी पत्रक शेअर करण्यात आले आहे. “भारतामधील अयोध्या शहरातील बाबरी मशीद पाडून त्याठिकाणी बांधण्यात आलेल्या राम मंदिराचा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आम्ही निषेध करतो”, असे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

“अयोध्येत मशिदीच्या जागेवर मंदिर बांधल्यामुळे भारताच्या लोकशाही चेहऱ्याला एक काळा डाग लागला आहे. विशेष म्हणजे, यानंतर आता वाराणसीतील ज्ञानवापी मशीद आणि मुथरेतील शाही ईदगाह मशिदीचाही आता नंबर लागणार असल्याचे सांगतिले जाते. त्यामुळे ही यादी वाढतच जात आहे. या मशिदींनाही विनाशाचा सामना करावा लागलणार आहे”, असेही या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

अयोध्येतून येताच पंतप्रधान मोदींचा पहिला मोठा निर्णय; “एक कोटी घरांवर…”

“गेल्या ३१ वर्षांतील घडामोडी आणि आजच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे पाहिले तर भारतातील वाढत्या बहुसंख्यांकवादाचे हे सूचक उदाहरण दिसत आहे. यातून भारतातील मुस्लिमांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात उपेक्षित ठेवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे”, असे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

पाकिस्तानने या पत्रकाच्या माध्यमातून भारतातील मुस्लीम समुदाय आणि अल्पसंख्याकांच्या प्रार्थना स्थळांना सुरक्षा पुरविण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानकडून भारताला उपदेश देण्यात येत असले तरी मानव अधिकार संस्थांच्या मतानुसार, उलट पाकिस्तानमध्ये हिंदू, ख्रिश्चन आणि अहमदी यासारख्या धार्मिक अल्पसंख्याकांना सतत भेदभावाचा सामना करावा लागतो. सामाजिक बहिष्कार, मर्यादित संधी आणि हिंसाचार अशा अत्याचाराचा त्यात समावेश आहे.

“आजचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हे बदलत्या भारताचं चित्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी…”, इमाम उमर अहमद इलियासींचं वक्तव्य

राम आग नाही ऊर्जा आहे

दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर म्हटले की, “राम आग नाही ऊर्जा आहे. राम विवाद नाही समाधान आहे. राम वर्तमान नाही अनंतकाल आहे. राम भारताचा आधारही आहे आणि विचारही आहे.” ते पुढे म्हणाले, “‘”एक काळ असा होता की लोक म्हणायचे की राम मंदिर तयार झालं तर आग लागेल. असे लोक भारताच्या सामाजिक भावनेच्या पवित्रतेला ओळखत नाहीत. श्रीरामाच्या मंदिराचे बांधकाम हे भारतीय समाजाच्या शांतता, संयम, परस्पर सौहार्द आणि समन्वयाचे प्रतीक आहे. या बांधकामामुळे आगीला नाही तर ऊर्जेला जन्म देत आहे. हे मंदिर केवळ देवाचे मंदिर नसून ते भारताच्या दृष्टीचे, भारताच्या तत्त्वज्ञानाचे, भारताचे मार्गदर्शक आणि रामाच्या रूपातील राष्ट्रीय चेतनेचे मंदिर आहे.”

ऑल इंडिया इमामर संघटनेचे मुख्य इमाम उमर अहमद इलियासी यांनी आजच्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यांनी मंदिर निर्माणाचे स्वागत केले.

“आज जे घडलं ते बदलत्या भारताचं चित्र आहे. आजचा भारत हा उत्तम भारत आहे. माझ्या बरोबर हे स्वामी उभे आहेत. याचंच नाव भारत आहे. मी इथे प्रेमाचा संदेश घेऊन आलो आहे. आमच्या पूजा पद्धती नक्कीच वेगळ्या असू शकतात, धार्मिक धारणा वेगळ्या असू शकतात, आस्था वेगळ्या असू शकतात. मात्र आमचा सर्वात मोठा धर्म माणुसकीचा आहे. आपण सगळे भारतीय आहोत. आमच्यासाठी राष्ट्र सर्वतोपरी आहे. आता आपण तिरस्कार आणि द्वेषभावना मागे सोडली पाहिजे. आत्तापर्यंत खूप लोक मारले गेले, त्यावरुन राजकारणही झालं. आता आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन भारतातली एकजूट कायम ठेवायची आहे”, अशी भूमिका इलियासी यांनी मांडली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan slams ram mandir opening urges india to protect religious minorities kvg