पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’चे प्रमुख लेफ्ट. जन. रिझवान अख्तर यांनी सोमवारी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेऊन त्यांना राष्ट्रीय सुरक्षेबाबत माहिती दिली.
काठमांडूमध्ये २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सार्क परिषदेच्या वेळी शरीफ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्या पाश्र्वभूमीवर अख्तर यांनी शरीफ यांच्याशी केलेल्या चर्चेला महत्त्व दिले जात आहे.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थिती आणि अन्य प्रश्नांची संपूर्ण माहिती घेऊन सार्क परिषदेला जाण्याचा शरीफ यांचा इरादा आहे. अख्तर आणि शरीफ यांच्यातील चर्चेचा तपशील कळू शकला नाही. मात्र अंतर्गत आणि सीमेवरील सुरक्षेबाबत उभयतांमध्ये चर्चा झाल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.
अख्तर यांनी ७ नोव्हेंबर रोजी ‘आयएसआय’च्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर शरीफ यांची त्यांनी दुसऱ्यांदा भेट घेतली. अख्तर हे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जन. राहील शरीफ यांचे निकटवर्तीय आहेत. या सार्क परिषदेत वाणिज्य आणि व्यापार त्याचप्रमाणे दहशतवादाचा धोका या प्रश्नांवर प्रकाशझोत टाकला जाईल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, काठमांडूत होणाऱ्या या सार्क परिषदेकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरील निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. या परिषदेत विविध मुद्दय़ांवर महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा