पीटीआय, इस्लामाबाद
सिंधू जल करारातील आपल्या हक्काचे पाणी थांबविणे किंवा अन्यत्र वळविणे ही युद्धकृती मानली जाईल, असे सांगत पाकिस्तानने गुरुवारी भारताच्या राजनैतिक कारवाईविरोधात सूर लावला. त्याच वेळी सिमला करारासह सर्व करार स्थगित केल्याचे तसेच पाकिस्तानची हवाई हद्द भारतीय विमानांना बंद केल्याचेही जाहीर करण्यात आले.
पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप करत बुधवारी केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्याची घोषणा केली. १९६०च्या सिंधू जल करारास स्थगिती देण्याचा महत्त्वाचा निर्णय या वेळी घेण्यात आला. त्यानंतर गुरुवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखील राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची (एनएससी) बैठक झाली. या बैठकीनंतर पाकिस्तान सरकारकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात बहुतांश मुद्दे हे केवळ भारताच्या निर्बंधांना ‘जशास तसे’ उत्तर देण्यात आले असले, तरी सिंधू जल करार स्थगित केल्यावरून शरीफ सरकारने आगपाखड सुरू केली आहे. ‘‘भारताने सिंधू जल करार एकतर्फी रद्द करणे पाकिस्तानला मंजूर नाही. प्रादेशिक शांततेसाठी हा करार महत्त्वाचा असून हे पाणी आमच्यासाठी राष्ट्रहिताचा मुद्दा आहे. सुमारे २४ कोटी पाकिस्तानी नागरिकांची जीवनरेषा या करारावर अवलंबून आहे. कोणत्याही परिस्थितीत आमच्या जलहिताचे संरक्षण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत,’’ असे बैठकीनंतर जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्याबरोबरच पाण्याचा प्रवाह थांबविण्याची किंवा अन्यत्र वळविण्याचा प्रयत्न ही युद्धकृती समजली जाईल, अशी दर्पोक्तीही पाकिस्तानने केली आहे. याशिवाय भारतीय कंपन्यांच्या विमानांना हवाई सीमाबंदी, त्रयस्थांमार्फत होणाऱ्या द्विपक्षीय व्यापाराला स्थगिती, सिमला कराराचे निलंबन अशा पोकळ धमक्याही पाकिस्तानने दिल्या आहेत. इस्लामाबाद उच्चायुक्तालयातील सैन्यदल सल्लागारांना परत बोलाविण्याची घोषणा भारताने केल्यानंतर आता पाकिस्तानने या अधिकाऱ्यांना ३० एप्रिलपूर्वी देश सोडण्यास बजावले आहे. तसेच ‘सार्क व्हिसा’अंतर्गत पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांचा व्हिसाही रद्द करण्यात आला असला, तरी याला पंजाबी यात्रेकरूंचा अपवाद करण्यात आला आहे. शरीफ यांनी घेतलेल्या या बैठकीला महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री तसेच तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख उपस्थित होते.
शरीफ सरकारचे नक्राश्रू
पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या लष्कर ए तोयबाची छाया असलेल्या ‘द रेझिस्टन्स फोर्स’चे म्होरके पाकिस्तानात मोकाट फिरत असताना शरीफ सरकारने हल्ल्याचा निषेध करत नक्राश्रू ढाळले आहेत. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचा पाकिस्तान स्वच्छ शब्दांत निषेध करतो. शांततेसाठी आम्ही आग्रही असलो, तरी देशाच्या स्वायत्ततेला आणि सुरक्षेला धक्का लागेल अशी गोष्ट सहन करणार नाही, अशी आगपाखडही एनएससी बैठकीनंतर जारी पत्रकात करण्यात आली आहे.