नवी दिल्ली : मुंबईवरील २६-११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या साजीद मीर याला पाकिस्तानात अटक झाल्यानंतर काही आठवडय़ांतच दोषी ठरविण्यात आले आहे. लष्कर- ए- तैयबाचा उपप्रमुख असलेल्या मीर याला दोषी ठरविले जाण्याची वेळ आणि पाकिस्तानला एफएटीएफच्या करडय़ा यादीतून बाहेर येण्यासाठी या संस्थेने दाखविलेली अनुकूलता लक्षात घेण्यासारखी आहे, असे भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दहशतवाद्यांना अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणात मीर याला १६ मे रोजी लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने दोषी ठरविले होते. त्याच्या तीन आठवडे आधी त्याला अटक करण्यात आली होती. त्याला तीन वेगवेगळय़ा शिक्षा म्हणून एकूण साडेपंधरा वर्षांसाठी कोट लखपत तरुंगात पाठविण्यात आले होते. पण याबाबत पाकिस्तान सरकारने अधिकृत माहिती न दिल्याने भारताच्या परराष्ट्र खात्याने अधिकृत भूमिका मांडली नव्हती. सोमवारी मीर याला सुनावलेल्या शिक्षेचा तपशील उपलब्ध झाला आहे. पण मीर याच्यावर अद्याप मुंबई हल्ल्याबाबत खटला चालविण्यात आलेला नाही. जैश ए महम्मदचा प्रमुख मसूद अझहर आणि त्याचा भाऊ रौफ असघर याच्यावरही कारवाईसाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव आहे.