पनामा पेपर्स प्रकरणामुळे अपात्र ठरवण्याच्या निकालावर पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दाखल केलेली फेरविचार याचिका फेटाळली असून, त्यांची अखेरची आशाही मावळली आहे. त्यांनी परदेशात बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या प्रकरणी त्यांना पार्लमेंटशी अप्रामाणिकपणा केल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवले होते. त्यावर शरीफ यांनी फेरविचार याचिका दाखल केली होती. शरीफ यांची मुले, जावई तसेच अर्थमंत्री दर यांच्याही याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. शरीफ यांची मुले व अर्थमंत्री इशाक दर यांनी सर्वोच्च न्यायालयाने २८ जुलैला दिलेल्या निकालावर स्वतंत्र आव्हान याचिका दाखल केलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्या वेळी दिलेल्या आदेशात शरीफ, त्यांची मुले हसन व मरियम तसेच जावई महंमद सफदर तसेच अर्थमंत्री दर यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे खटले चालवण्याचा आदेश दिला होता.
शुक्रवारी न्या. असीफ सईद खान खोसा यांच्या नेतृत्वाखालील पीठापुढे शरीफ यांनी दाखल केलेल्या फेरविचार याचिकेची सुनावणी झाली. विशेष म्हणजे ज्या न्यायपीठाने त्यांना अपात्र ठरवले होते त्याच न्यायपीठापुढे ही सुनावणी झाली असून, काही कारणास्तव या सर्व फेरविचार याचिका फेटाळण्यात येत आहेत. त्याची कारणे नंतर सांगितली जातील असे न्यायाधीश खोसा यांनी सांगितले. फेरविचार याचिकांवर सोमवारपासून सुनावणी सुरू झाली होती. आता शरीफ यांच्यापुढचे सर्व कायदेशीर पर्याय संपले असून, जर पुढील वर्षीच्या निवडणुकांत नवाझ शरीफ यांच्या पक्षाला दोनतृतीयांश बहुमत मिळाले तर अपात्रतेचा कालावधी आजीवन न ठेवता मर्यादित करता येऊ शकतो. हा एक शेवटचा मार्ग शिल्लक आहे. शरीफ यांच्या मुलांची व जावयाची बाजू वकील सलमान अक्रम राजा यांनी मांडली, तर शरीफ यांची बाजू वकील ख्वाजा हॅरिस यांनी मांडली. दर यांचे प्रतिनिधित्व शाहीद हमीद यांनी केले.
शरीफ यांच्या वकिलाचे युक्तिवाद
जे वेतन कधी मिळालेच नाही ते जाहीर न केल्याच्या मुद्दय़ावर शरीफ यांना अपात्र ठरवण्याचा मुद्दा येतोच कुठे, असा युक्तिवाद शरीफ यांचे वकील हॅरिस यांनी केला, पण तो फेटाळण्यात आला. मालमत्ता जाहीर न केल्याच्या आरोपावरून त्यांना अपात्र ठरवता येणार नाही, केवळ त्यांची निवड रद्द करता येईल, असा मुद्दा हॅरिस यांनी मांडला. पण तोही न्यायालयाने फेटाळला.
इतरही अनेक तांत्रिक आक्षेप न्यायालयाने फेटाळून लावले. शरीफ कुटुंब व दर यांना आता नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोच्या भ्रष्टाचारविरोधी खटल्यांना सामोरे जावे लागणार आहे. शरीफ व त्यांच्या मुलांनी लंडनमध्ये तसेच परदेशात कंपन्या व घरे खरेदी केल्याची माहिती पनामा पेपर्समधून उघड झाली होती.