भारतीय विद्यार्थी आणि परदेशी विद्यार्थ्यांनी पाकिस्तानातील शिक्षण संस्थांमधून शिक्षण घेतल्यास ते भारतात उच्च शिक्षण आणि नोकरीच्या संधींसाठी पात्र ठरणार नाही, असे विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) स्पष्ट केले आहे.

चीनमधील विद्यापीठांतून केवळ ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केलेली पदवी भारतात ग्राह्य धरली जाणार नसल्याचे यूजीसी आणि एआयसीटीई यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यानंतर आता पाकिस्तानमधील सर्वच अभ्यासक्रमांबाबतचे स्पष्टीकरण यूजीसी आणि एआयसीटीई यांच्याकडून संयुक्त परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहे.

…तरच भारतात नोकरीसाठी पात्र!

पाकिस्तानातील शिक्षण संस्थेत शिकण्यासाठी प्रवास करू नये. पाकिस्तानातील शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयात शिक्षण घेतलेले भारतीय विद्यार्थी आणि परदेशी विद्यार्थी भारतात उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी पात्र ठरणार नाहीत, असे आयोगाने नमूद केले आहे. दरम्यान, स्थलांतरित नागरिक आणि त्यांच्या मुलांनी पाकिस्तानातील शिक्षण संस्थेतून पदवी मिळवली असल्यास आणि त्यांना भारताकडून नागरिकत्त्व प्रदान केलेले असल्यास केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सुरक्षिततेसंदर्भातील पूर्तता केल्यानंतर ते भारतात नोकरीसाठी पात्र ठरू शकतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.