एका आत्मघातकी हल्लेखोराला शाळेबाहेरच थोपवून स्वत:च्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या १४ वर्षीय ऐतझाझ हसन या विद्यार्थ्यांला खैहर-पख्तुन्वा प्रांतीय सरकारने ‘महानायक’ घोषित केले आहे.
हंगू जिल्हय़ातील इब्राहिमझाई येथील सरकारी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच आत्मघातकी हल्लेखोराला रोखले त्या वेळी हल्लेखोराने स्वत:ला उडविले असता त्यामध्ये हसन हा विद्यार्थी ठार झाला. आत्मघातकी हल्लेखोराला शाळेत प्रवेश करण्यापासून हसनने रोखले आणि स्वत:च्या प्राणांची आहुती देऊन हसनने शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांचे प्राण वाचविले.
इब्राहिमझाई हा शियापंथीयांचे प्राबल्य असलेला परिसर असून सदर हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-जांगवी या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.
हसन सोमवारी शाळेत उशिरा पोहोचला, त्यामुळे त्याला शिक्षा म्हणून प्रार्थनेला हजर राहण्याची अनुमती नाकारण्यात आली. शाळेच्या प्रवेशद्वारावरच उभा असताना त्याला संशयास्पद स्थितीत फिरताना एक व्यक्ती दिसली. त्यामुळे हसनने त्याला हटकताच त्याने शाळेच्या दिशेने जाण्याचा वेग वाढविला. ते पाहताच हसनने त्याच्या दिशेने एक दगड भिरकावला. मात्र तो त्या व्यक्तीला लागला नाही.
त्यामुळे हसनने धावत जाऊन त्याला पकडले आणि शाळेत प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्याच क्षणी हल्लेखोराने आपल्याकडील बॉम्बचा स्फोट घडविला, त्यामध्ये हसन ठार झाला. हसनने असामान्य शौर्य गाजविले असल्याने त्याची योग्य ती दखल घेण्याची अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा