मुंबईवर २००८ मध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा मानवतेविरोधातील गुन्हा आहे. हा निर्घृण हल्ला घडविणाऱ्या गुन्हेगारांच्या शिक्षेसाठी पाकिस्तानवर दबाव आणणे आवश्यक असल्याचे मत एड रॉइस यांनी व्यक्त केले आहे. अमेरिकी काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण अशा परराष्ट्र संबंधविषयक समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे ते लवकरच स्वीकारणार आहेत.
  भारतीय पत्रकारांच्या गटाशी बोलताना ते म्हणाले, ‘‘भारतात जाऊन हिंसाचाराचे थैमान घालणाऱ्या दहशतवाद्यांवर पाकिस्तानात वा हेग येथील आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी प्रतिबंधक न्यायालयात खटला चालविला गेला तरी माझी हरकत नाही. मात्र त्यांच्या कृत्याबद्दल त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. त्यांनी निष्पाप स्त्री-पुरुष व मुलांची हत्या केली आहे. त्याबाबत न्याय मिळायलाच हवा आणि त्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणायला हवा.’’अमेरिकी प्रतिनिधीगृहात रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असून, या पक्षाने सभागृहाच्या परराष्ट्र संबंधविषयक समितीचे अध्यक्ष म्हणून रॉइस यांच्या नावाची घोषणा बुधवारी केली. ते सध्या सभागृहाच्या भारतविषयक समितीचे सहअध्यक्ष आहेत. मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या तसेच इतर अतिरेकी कारवायांमध्ये गुंतलेल्या घटकांवर कठोर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव टाकण्यावर आपण भर देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. याचबरोबर अमेरिका-भारत यांच्यातील व्यापारी संबंध वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
व्यापार तसेच गुंतवणूक स्थितीत खुलेपणा आणण्यासाठी दोन्ही देशांनी आवश्यक त्या सुधारणा केल्या पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. दहशतवादाविरोधातही भारत-अमेरिका यांच्या संयुक्त प्रयत्नांची गरज त्यांनी प्रतिपादन केली. 

Story img Loader