पीटीआय, इस्लामाबाद
रोख रकमेची चणचण जाणवत असलेला पाकिस्तान रशियाकडे कच्च्या तेलाची पहिली मागणी पुढील महिन्यात नोंदवण्याच्या विचारात असून, हे तेल पाकिस्तानात पोहचण्यास सुमारे चार आठवडे लागतील, असे पेट्रोलियम राज्यमंत्री मुसादिक मलिक यांनी सांगितले.फार मोठय़ा प्रमाणावरील विदेशी कर्ज आणि कमजोर झालेले स्थानिक चलन यांच्याशी झगडत असलेला पाकिस्तान रशियाकडून स्वस्त कच्चे तेल सवलतीच्या दरात खरेदी करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे.
रशियाकडून सवलतीच्या दरातील तेल खरेदी करण्याचा पाकिस्तान विचार करत असल्याचे अर्थमंत्री इशाक दार यांनी गेल्या वर्षी सांगितले होते. शेजारी देश भारत रशियाकडून तेल खरेदी करत असून, पाकिस्तानलाही ही शक्यता पडताळून पाहण्याचा अधिकार आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले होते, असे वृत्त ‘डॉन न्यूज’ने दिले आहे.
यानंतर तेल आणि वायुपुरवठय़ाबाबत चर्चा करण्यासाठी मलिक रशियाला गेले होते. त्यांच्या दौऱ्यानंतर, आपण रशियाकडून कच्चे तेल, पेट्रोल व डिझेल खरेदी करणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते.गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रशियाने पाकिस्तानला कच्चे तेल ३० टक्के सवलतीच्या दरात पुरवण्यास नकार दिला होता.