चिनाब नदीच्या जोरदार प्रवाहाने वाहून पाकिस्तानी हद्दीत गेलेल्या सीमा सुरक्षादलाच्या जवानास पाकिस्तान शुक्रवारी भारताच्या स्वाधीन करणार आहे.
अखनूर परिसरात सीमा सुरक्षादलाच्या चार जवानांची एक तुकडी चिनाब नदीतून बोटीने गस्त घालत होती. परंतु या बोटीचे इंजिन बंद पडल्याने या जवानांना आणण्यासाठी दुसरी बोट पाठविण्यात आली. तीन जण या बोटीत चढले. परंतु त्या बोटीत चढण्यासाठीचा दोर अचानक तुटल्याने सत्यशील यादव हा जवान नदीत पडला आणि जोरदार प्रवाहामुळे सुमारे ४०० मीटर दूरवर वाहत पाकिस्तानी हद्दीत जाऊन पोहोचला. पाकिस्तानच्या सियालकोट परिसरातील एका गावातील गावकऱ्यांनी त्याला पकडून पाकिस्तानी ‘रेंजर्स’च्या (पाकिस्तानी सीमा सुरक्षादल) ताब्यात दिले होते.
हा जवान कोणत्याही मोहिमेत सहभागी झालेला नव्हता तर निव्वळ गस्तीवर होता. अपघाताने तो पाकिस्तानी हद्दीत गेला आहे, ही वस्तुस्थिती सीमा सुरक्षादलाने पाकिस्तानी रेंजर्सना सांगितली होती. रेंजर्सनी त्यास अनुकूल प्रतिसाद देत उद्या या जवानाला भारतात परत पाठवण्यात येईल, असे कळवले आहे.
या मुद्दय़ावर दोन्ही दलांच्या कंपनी कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांची एक तातडीची ‘ध्वज बैठक’ आज दुपारी जम्मूच्या सुंदरबनी सेक्टरमधील निकोवाल सीमेवर झाली. या बैठकीत उद्या दुपारी ३.०० वाजता सत्यशील यादव यास भारताच्या स्वाधीन करण्याचे आश्वासन पाकिस्तानी रेंजर्सनी सीमा सुरक्षादलाच्या अधिकाऱ्यांना दिले. यादवची स्थिती उत्तम असून पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केल्याचे सांगण्यात आल्याचे सीमा सुरक्षादलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader