Pakistan Diplomate Denied Entry in US: अवघ्या आठवड्याभरापूर्वी अमेरिकेच्या संयुक्त सभेसमोर केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे आभार मानले होते. एका अट्टल दहशतवाद्याला पकडून देण्यात पाकिस्तान सरकारने मदत केल्याचा उल्लेख त्यांनी केला. पण नुकतंच अमेरिकन प्रशासनाने पाकिस्तानच्या उच्चाधिकाऱ्यांना देशात प्रवेशच नाकारल्यामुळे या मुद्द्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा पाहायला मिळत आहे. के. के. एहसान वॅगन असं या उच्चाधिकाऱ्यांचं नाव असून त्यांच्या व्हिसामध्ये आक्षेपार्ह नोंदी आढळल्याचा दावा करण्यात येत आहे.
पाकिस्तानचे तुर्कमेनिस्तानमधील उच्चाधिकारी वॅगन सोमवारी अमेरिकेच्या लॉस एंजेलिस विमानतळावर उतरले. विमातनतळावर त्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली. पाकिस्तानातून अमेरिकेत प्रवास करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्र त्यांच्याकडे होती. वॅगन हे अमेरिकेत सुट्ट्यांसाठी जात असताना त्यांना लॉस एंजेलिस विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी हटकलं आणि कागदपत्रांवर आक्षेप घेतला. बिझनेस स्टँडर्डनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
परत पाठवण्याचं कारण काय?
वॅगन यांना कागपपत्रांमधील आक्षेपार्ह मुद्द्यांवर आक्षेप घेत अमेरिकेत प्रवेश नाकारला. त्यांच्या कागदपत्रांमध्ये असणारा मजकूर नियमांना धरून नसल्याचं नमूद करत अमेरिकेच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी वॅगन यांना त्यांच्या आधीच्या ठिकाणी परतण्यास सांगितलं. त्यामुळे अमेरिकेतील व्हिसाविषयक नियम, उच्चाधिकाऱ्यांसंदर्भातले प्रोटोकॉल्स आणि या प्रकरणात करण्यात आलेली कारवाई, यावर संशय व्यक्त केला जात आहे. अमेरिकेकडून मात्र या कारवाईबाबत कोणतीही अधिकृत भूमिका अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
कोण आहेत वॅगन?
ज्या के. के. एहसान वॅगन यांना अमेरिकेनं परत पाठवलं, त्यांनी पाकिस्तान सरकारसाठी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्यात त्यांच्यावर याआधी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही सोपवण्यात आल्या आहेत. पाकिस्तानच्या काठमांडू येथील दूतावासात सहाय्यक सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्याशिवाय, लॉस एंजेलिस येथील पाकिस्तानचे डेप्युटी कौन्सिल जनरल, मस्केटमध्ये पाकिस्तानचे राजनैतिक अधिकारी अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत.
दरम्यान, एहसान वॅगन यांना लवकरच इस्लामाबादमध्ये मंत्रालयात पाचारण करून त्यांच्याकडून नेमकं प्रकरण समजून घेतलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात पाकिस्तान सरकारमध्ये वरीष्ठ पातळीवर चर्चा झाली असून परराष्ट्र मंत्री इशक दार व परराष्ट्र सचिव आमना बलोच यांच्याकडे या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. यासंदर्भात पाकिस्तानचे परराष्ट्र खाते लवकरच अमेरकेतील उच्चपदस्थांशी चर्चा करणार असल्याचंही सांगितलं जात आहे.