Pakistan Train Attack Baloch Liberation Army Hijack Train : भारताच्या शेजारील राष्ट्र पाकिस्तानमधील अशांत अशा बलुचिस्तान प्रांतात फुटीरतावाद्यांनी सुमारे ५०० प्रवाशांना घेऊन पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसवर हल्ला केला आणि त्यांनी या रेल्वेचं अपहरण केलं आहे. ट्रेनमधील प्रवाशांची सुटका करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराला पाचारण करण्यात आलं. त्यानंतर लष्कर व फुटीरतावाद्यांमध्ये काही चकमकी झाल्या. पाकिस्तानी सरकारने या घटनेबाबत, त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने केलेल्या कारवाईबाबत फारशी माहिती उघड केली नसली तरी, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) जाफर एक्सप्रेसमधील सुरक्षा दलांसह २१४ हून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवल्याचा दावा केला आहे.तसेच, यावेळी फुटीरतावादी व पाकिस्तानी लष्कराबरोबर झालेल्या संघर्षात लष्कराचे ३० जवान शहीद झाल्याचा दावा बीएलएने केला आहे.

पाकिस्तानी सुरक्षा बलाने माघार घेतली नाही तर ओलिसांना ठार मारू अशी धमकी बीएलएने दिली आहे. दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने दावा केला आहे की आम्ही फुटीरतावाद्यांच्या ताब्यातून १०४ नागरिकांची सुटका केली आहे. हा हल्ला बीएलएच्या माजिद ब्रिगेडने केला आहे, जी बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणाऱ्या बीएलएने पाकिस्तान आणि चीनविरुद्ध नवीन तीव्र आक्रमणाची अलीकडेच घोषणा केली होती. त्यानंतर आता हा हल्ला झाला आहे.

बलुच लिबरेशन आर्मीच्या मागण्या काय?

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या कोणत्याही सुरक्षा एजन्सीचा प्रभाव नसावा, या प्रांतात सुरक्षा एजन्सीचा प्रतिनिधी नसावा, ही बीएलएची प्रमुख मागणी आहे. यासह चीन सरकारने बलुच प्रांतात सुरू केलेल्या सीपीईसी प्रकल्पावर बलुचिस्तानी लोक नाराज आहेत. या प्रकल्पाद्वारे बलुच प्रांतातील खनिजे लुटली जात असल्याचा येथील लोकांचा दावा आहे. तसेच या प्रकल्पामुळे बलुच प्रांतातील हजारो लोकांना विस्थापित व्हावं लागलं आहे. काही वेळा सरकारने स्थानिकांच्या मागण्या धुडकावून त्यांचं विस्थापन केलं आहे. त्यामुळे बलुच लोक गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पाविरोधात आंदोलन करत आहेत. याच काळात काही फुटीरतावाद्यांनी शस्त्रे हाती घेतली. दुसऱ्या बाजूला, सरकारने बलुचिस्तानी लोकांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे संघर्ष वाढला आहे.

बलुचिस्तानी फुटीरतावाद्यांचा हा काही पहिला हल्ला नव्हे. सीपीईसी प्रकल्पाला विरोध म्हणून फुटीरतावाद्यांनी अनेक वेळा पाकिस्तानवर असे हल्ले केले आहेत. तसेच चिनी अभियंते आणि पाकिस्तानी राजदूतांना लक्ष्य केलं आहे.

Story img Loader