पाकिस्तानी रेंजर्सनी भारतीय सीमेलगत सीमा सुरक्षा दलाने सुरू केलेल्या जम्मू-काश्मीरमधील सांबा क्षेत्रातील बांधकामाला आक्षेप घेत गोळीबार केला. त्यांनी सतत नव्वद मिनिटे गोळीबार केला, त्याला भारतीय सैन्यानेही जोरदार प्रत्युत्तर दिले.
सीमा सुरक्षा दलाने शस्त्रसंधी उल्लंघनाला प्रत्युत्तर दिले असून त्यात प्राणहानी झाल्याचे वृत्त नाही. पाकिस्तानी रेंजर्सनी छोटय़ा बंदुकातून सांबा क्षेत्रात २५ फैरी झाडल्या. सकाळी अकरा ते १२.४५ पर्यंत त्यांनी गोळीबार केला व भारताने त्याला प्रत्युत्तरही दिले. पाकिस्तानी रेंजर्सनी भारताच्या बाजूकडील बांधकामाला आक्षेप घेतला असून भारताने सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसाठी तिथे बाथरूमचे काम सुरू केले आहे, त्याला पाकिस्तानचा आक्षेप आहे.
आम्ही संरक्षक भिंत बांधायला घेतल्यापासून त्यांनी आक्षेप घेतला आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी रविवारी सकाळी साडेदहा वाजता बांधकाम थांबवायला सांगितले पण आम्ही ते सुरूच ठेवले. त्यामुळे त्यांनी गोळीबार केला व आम्हीही त्याला प्रत्युत्तर दिले असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader