पाकिस्तानने सीमारेषेवर शस्त्रसंधीचे मोठे उल्लंघन केले असून, पाकिस्तानी रेंजर्सनी बुधवारी भारतीय सीमेवरील छावणीवर केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान धारातीर्थी पडला असून इतर तीन जण जखमी झाले आहेत. जम्मू जिल्हय़ातील आंतरराष्ट्रीय सीमेवर ही घटना घडली.
पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मू जिल्हय़ातील आर. एस. पुरा येथील अर्णिया या सीमावर्ती भागातील पीट्टल या छावणीवर सकाळी सव्वाअकरा वाजता बेछूट गोळीबार केला, असे सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सकाळी साडेअकराच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे चार जवान जखमी झाले असून, भारतीय जवानांनी त्यानंतर प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. त्यानंतर जखमींपैकी सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाचे बुधवारी निधन झाले. इतर तीन जखमी जवानांवर जम्मू येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाक रेंजर्सनी केवळ शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असे नाहीतर बेछूट गोळीबारही केला. सांबा जिल्हय़ात छम्बलियाल सीमा छावणीजवळ ध्वज बैठक झाल्यानंतर दोनच दिवसांनी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा