काश्मीर फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्याची आढय़ताखोरी पाकिस्तानने केल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सचिवस्तरीय बोलणी फिस्कटली तरी त्यांच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. पाकिस्तानी सैन्याने शनिवारी जम्मू येथील भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या २२ चौक्यांवर तसेच १३ पाडय़ांवर अंदाधुंद गोळीबार आणि तोफगाळ्यांचा मारा केला. या हल्ल्यात दोन नागरिक मृत्युमुखी पडले. केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन केले जात असून गेल्या दोन आठवडय़ांतील शस्त्रसंधी भंगाची ही २० वी वेळ आहे.
शुक्रवारी रात्री साडेबारानंतर अर्निया, आर.एस. पुरा आणि पूंछमधील हमीरपूर या उपक्षेत्रांत पाकिस्तानी सैन्याने  बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यांत सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानासह ६ जण जखमी झाले. असे हल्ले करून पाकिस्तान भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न करीत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारू नयेत अशी इच्छा असणाऱ्या शक्तींचाच यामागे हात आहे, मात्र भारताकडून अशा छुप्या युद्धास वेळोवेळी चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असे केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या परिसरात असलेल्या खेडय़ांमधील किमान तीन हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी ८२ एमएम उखळी तोफगोळय़ांचा मारा २२ छावण्या व १३ पाडय़ांवर केला. जोरा येथील शेतात अक्रम हुसेन व त्यांचा मुलगा अस्लम हे ठार झाले. त्यांच्या घरात पाकिस्तानी तोफगोळय़ाचा स्फोट झाला, असे आर. एस. पुरा येथील पोलीस अधिकारी देवेंदर सिंग यांनी सांगितले.
पाकव्याप्त काश्मीरमधून बोगदा?
जम्मू जिल्हय़ातील पालनवाला भागात चालका छावणीनजीक पाकव्याप्त काश्मीरच्या बाजूने बोगदा खणण्यात आल्याचे दिसल़े  सैनिकांना एका ठिकाणी जमीन भुसभुशीत लागली व नंतर थोडा धक्का देताच ती खचली, त्यामुळे तेथे बोगदा असल्याचे सकृद्दर्शनी दिसून येत आहे.

Story img Loader