पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना सरकारने समज दिली असतानाही शनिवारी पाकिस्तानच्या लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची आगळीक केली. पाकिस्तानी सैन्याने लहान शस्त्रांनी हल्ला चढविताच भारतीय जवानांनी त्याला सडेतोड जबाब दिला.
जम्मू जिल्ह्य़ाच्या पालनवाला क्षेत्रात पाकिस्तानच्या सैन्याने लहान शस्त्रांनी गोळीबार केला. गोळीबार होताच भारतीय जवानांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले.
या चकमकीत जीवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही, असे संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितले.गेल्या सात तासांत पाकिस्तानच्या सैन्याकडून झालेले हे दुसरे उल्लंघन असून, जुलै महिन्यात एकूण आठ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे.
 जम्मू जिल्ह्य़ातील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानच्या रेंजर्सकडून २० जुलै रोजी मोठय़ा प्रमाणावर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. तोफगोळे आणि बेछूट गोळीबारात अनेक घरांचे नुकसान झाले, असे प्रवक्त्याने सांगितले.

Story img Loader