चालू महिन्यात प्रथमच पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, भारताच्या आघाडीवरील चौक्यांवर छोटय़ा शस्त्रांनी व स्वयंचलित शस्त्रांनी मारा केला आहे. जम्मू-काश्मीरमधील पूँछ क्षेत्रात पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तर दिले.
संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनीष मेहता यांनी सांगितले, की पाकिस्तानी सैन्याने पूँछ जिल्हय़ात छोटय़ा शस्त्रांनी बेछूट गोळीबार केला. भारतीय सैनिकांनी लगेच पवित्रा घेऊन पाकिस्तानच्या छावण्यांवर गोळीबार केला.
यात प्राणहानी किंवा मालमत्ता हानी झाली नाही. ऑगस्ट महिन्यात प्रथमच शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले असून, पूँछ क्षेत्रात आघाडीवरच्या शेर शक्ती छावणीवर पाकिस्तानच्या ६४१ मुजाहिद रेजिमेंटने गोळीबार केला. सोळाव्या कमांडचे लेफ्टनंट जनरल के. एच. सिंग यांनी सांगितले, की भारतीय लष्कराला पाकिस्तानी तुकडय़ांनी केलेल्या गोळीबारास ठोस प्रत्युत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घुसखोरी, गोळीबारही खपवून घेतला जाणार नाही असे बजावण्यात आले आहे.
पाकिस्तानने जुलैत किमान आठ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते, तर जूनमध्ये जम्मूमध्ये प्रत्यक्ष ताबारेषेवर पाच वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. एप्रिल व मे महिन्यात प्रत्यक्ष ताबारेषेवर शस्त्रसंधी उल्लंघनाच्या १९ घटना घडल्या होत्या.

Story img Loader