काश्मीरमधील सांबा जिल्ह्य़ात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून सीमेवरील ४० छावण्या व किमान २४ घरांवर तोफगोळे फेकले व गोळीबारही केला.
आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने केलेल्या या गोळीबारात तीन जण जखमी झाले. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. सकाळी सात वाजेपर्यंत हा गोळीबार सुरू होता, असे सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाकिस्तानी रेंजर्सनी सीमेवरील ३५ ते ४० चौक्यांवर उखळी तोफांचा मारा केला व जम्मूतील अर्णिया तसेच आरएस पुरा भागात रात्री साडेनऊ वाजता गोळीबार सुरू केला. पाकिस्तानी रेंजर्सनी या वेळी प्रथमच सांबा जिल्ह्य़ात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
पाकिस्तानने सीमेवरील अर्णिया, आरएस पुरा, कनाचक व अखनूर या उपक्षेत्रात तसेच सांबा जिल्ह्य़ातील रामगड भागात पाकिस्तानने सीमेवरील छावण्या व काही खेडय़ांमध्ये हल्ला केला. अधिकृत अहवालानुसार रात्रीपासून सकाळपर्यंत २४ खेडय़ांत गोळीबार केला. मानवी हानी झाली नसली, तरी तीन नागरिक जखमी झाले त्यात फ्लोरा खेडय़ातील दोन व खोथर भागातील एक असे तीन जण जखमी झाले. जोरा येथे शेतात गुरे जखमी झाल्याची घटना आरएस पुरा भागात झाली असे उपविभागीय अधिकारी देवेंदर सिंग यांनी सांगितले. पाकिस्तानने पंधरवडय़ात २१ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून ऑगस्टमध्ये २३ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व पंतप्रधान कार्यालयातील मंत्री जितेंद्र सिंग यांनी सीमेवरील खेडय़ातून स्थलांतरित झालेल्या व सध्या आरएस पुरा येथील छावण्यात ठेवलेल्या लोकांची भेट घेतली.

Story img Loader