किस्तानात शनिवारी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत हिंसाचाराने थैमान घातले असले तरी सामान्य नागरिकांनी तालिबानी अतिरेक्यांच्या धमक्यांना न जुमानता मतदानात उत्साहाने भाग घेतला. मतमोजणीस रात्री सुरूवात झाली असून प्रारंभीच्या अंदाजानुसार माजी पंतप्रधान नवाझ शरीफ (पाकिस्तान मुस्लिम लीग, नवाझ) आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू इम्रान खान पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ) यांचे पक्ष आघाडी गाठण्याची चिन्हे दिसत आहेत. नवाझ शरीफ हे पंजाब प्रांतातील सारगोधा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. शरीफ यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार ‘तेहरीक-ए-इन्साफ’ चे नेते नूर हयात यांचा १९ हजार १२५ मतांनी पराभव केला. याखेरीज इम्रान खान हेही पेशावर-१ मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांचा पक्ष ३२ जागांवर आघाडीवर आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार गुलाम बिलौर यांचा त्यांनी ६६ हजार ४६४ मतांनी पराभव केला. दरम्यान, पाकिस्तानात संमिश्र सरकार सत्तारूढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
प्रारंभिक निकालाच्या प्रारंभी अंदाजानुसार, पंजाब प्रांतात इम्रान खान यांचा पक्ष १५ जागांवर आघाडीवर असून त्यामुळे नवाझ शरीफ यांना त्याची झळ बसू शकते. निवडणूक झालेल्या २७२ जागांपैकी शरीफ यांचा पक्ष किमान १०३ जागांवर आघाडीवर असल्याचे दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवरून सांगितले जात होते. याखेरीज पाकिस्तान पीपल्स पार्टी केवळ ३१ जागांवर तर १० जागी अपक्ष आघाडीवर होते. कोणत्याही पक्षाला सरळ बहुमत प्राप्त करण्यासाठी १३७ जागांवर विजय मिळण्याची गरज आहे. नवाझ शरीफ यांचा पक्ष सर्वात जास्त जागा मिळवेल असा अंदाज असला तरी इम्रान खान यांचा पक्षही चांगली कामगिरी करीत असल्याची चिन्हे असल्यामुळे सर्वाधिक जागा पटकावून सत्तारूढ होण्याचे शरीफ यांचे स्वप्न भंगण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र,  पाकिस्तान पीपल्स पार्टीला सत्तेवरून हुसकावून लावण्यासाठी शरीफ आणि इम्रान खान हे  परस्परांशी हातमिळवणी करण्याचेही संकेत राजकीय वर्तुळात मिळत आहेत.
हिंसाचारात २४ ठार
पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत असताना िहसाचाराने थैमान घातले. त्यात कराची, क्वेट्टा व पेशावर येथे बॉम्बस्फोट झाले असून, २४ ठार तर ४० जण जखमी झाले आहेत.
पाकिस्तानात मतदान सुरू झाल्यानंतर काही तासांतच कराचीत अवामी नॅशनल पार्टीच्या निवडणूक कार्यालयाजवळ दोन बॉम्बचे स्फोट झाले. पहिला स्फोट अवामी नॅशनल पार्टीचे उमेदवार अमानुल्ला मेहसूद यांच्या निवडणूक कार्यालयाजवळ झाला. ते सिंध असेंब्लीसाठी निवडणूक लढवत आहेत. काही किलोमीटर अंतरावरून या बॉम्बस्फोटाचा आवाज आला. मेहसूद हे या बॉम्बस्फोटातून बचावले. त्यांच्या पक्षाचे काही कार्यकर्ते यात मृत्युमुखी पडले, तर काही जखमी झाले.
दुसरा स्फोट हा काही मिनिटांतच एका मतदान केंद्राजवळ झाला. तेथेच आसपास अवामी नॅशनल पार्टीचे कार्यालयही होते. पहिल्या हल्ल्यात मदतकार्य करणाऱ्या पथकांची धावपळ सुरू असतानाच हा स्फोट झाला. या दुसऱ्या स्फोटामुळे मतदान केंद्रावर चेंगराचेंगरी झाली व मतदान प्रक्रिया विस्कळीत झाली. पेशावर येथील छरसडा रस्त्यावर एका मतदान केंद्रावर पाचजण बॉम्बस्फोटात जखमी झाले. हा बॉम्ब मतदान केंद्राजवळ लावण्यात आलेल्या मोटारसायकलवर ठेवण्यात आलेला होता. बलुचिस्तानची राजधानी असलेल्या क्वेट्टा येथे स्फोटात अनेक जण जखमी झाले. कुठल्याही गटाने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. ‘तेहरीक ए तालिबान पाकिस्तान’ या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेने निवडणूक काळात अनेकदा अवामी नॅशनल पार्टी, पाकिस्तान पीपल्स पार्टी व मुत्तहिदा कौमी मुव्हमेंट या पक्षांना निवडणूक प्रचाराच्या वेळी लक्ष्य केले होते. तालिबानी हल्ल्यात या दोन्ही पक्षांच्या काही उमेदवारांसह अनेक कार्यकर्त्यांनी प्राण गमावले आहेत. निवडणुकीच्या काही काळ अगोदरच तालिबानने निवडणुकीच्या दिवशी आत्मघाती हल्ले व बॉम्बहल्ले करण्याचा इशारा दिला होता.

Story img Loader