पाकिस्तानची बॉर्डर अॅक्शन टीम अर्थात BAT चे जवान आणि पाकिस्तानमधून येणारे दहशतवादी किती खालच्या पातळीला जाऊ शकतात याचे उदाहरण समोर आले आहे. पूँछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात या दहशतवाद्यांनी खास खंजीर आणले होते. या खंजीरांच्या मुठींवर कॅमेरा लावण्यात आला होता. तसेच बॅटच्या जवानांसोबत डोक्यावर लावण्याचा कॅमेराही आढळला आहे. त्यामुळे भारतीय जवानांवर हल्ला करताना क्रौर्याची परिसीमाच गाठली जाते आहे. गेल्या आठवड्यात पूँछमध्ये बॅटच्या दहशतवाद्यांकडून आणि बॅटच्या दोन जवानांकडून भारतीय जवानांच्या तुकडीवर हल्ला चढवला गेला. त्यात दोन भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर हे क्रौर्य समोर आले आहे.
पाकिस्तानच्या एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले. त्याचा मृतदेह घुसखोर घेऊन गेले. पण तो जिथे मारला गेला, तिथे त्याच्याकडे असलेली बॅग तपासताना भारतीय सैन्यदलाला या सगळ्या गोष्टी सापडल्या आहेत. पाकिस्तानमधून आलेल्या या घुसखोरांनी आणि बॅटच्या जवानांनी, भारतीय सैन्यदलाची मानसिकता खच्ची करण्याचे ठरवले आहे. त्याचमुळे कॅमेरा असलेला खंजीर, डोक्यावर कॅमेरा असलेल्या टोप्या, तसेच एके बनावटीची रायफल, ३ मॅगझिन आणि २ हे सगळे शोध मोहिमेदरम्यान आढळलेल्या बॅगमध्ये सापडले आहे. भारतीय जवानांवर हल्ला करायचा त्यांना ठार करायचे, त्यानंतर त्यांच्या मृतदेहाची विटंबना करतानाचा व्हिडीओ काढायचा आणि तो सोशल मीडियावर प्रसारित करायचा, ज्यामुळे कुठेतरी भारतीय सैनिकांचे मनोधैर्य खचेल. असा या दहशतवाद्यांचा आणि पर्यायाने पाकिस्तानचा अॅक्शन प्लान असल्याचे एका सैन्यदलाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.
जवानांच्या मृतदेहाची विटंबना लाईव्ह दाखवली जात होती का? हे अद्याप समजू शकलेले नाही. पण याबाबत आम्ही माहिती घेतो आहोत. बॅटच्या जवानांचा कॅमेरा आणि इतर डेटा तपासला जातो आहे. पाकिस्तानात बॅटच्या जवानांना आणि दहशतवाद्यांना खास ट्रेनिंग दिले जात आहे. सीमारेषेपासून ३ किलोमीटर अंतरावर जाऊन हल्ला करायचा आणि पाकिस्तानात पळून यायचे ही शिकवणूक त्यांना दिली जाते आहे. गुरूवारी पूँछमध्ये गस्त घालणाऱ्या भारतीय सैन्यदलाच्या तुकडीवर दहशतवादी आणि बॅटच्या जवानांनी निशाणा साधला होता, ज्यामध्ये दोन जवान शहीद झाले. तर पाकिस्तानी चौक्यांकडूनही गोळीबार करण्यात आला. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यदलानेही गोळीबार केला. ज्यात एक जण ठार झाला. मात्र त्याचा मृतदेह घेऊन घुसखोर दहशतवादी आणि बॅटचे जवान पळून गेले. असे असले तरीही दहशतवाद्यांची आणि पाकिस्तानी सैन्यदलाची मानसिकता किती घाणेरडी आहे, हेच या घटनेवरुन समोर आले आहे. निदान आता तरी भारताकडून पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे असे प्रत्येक नागरिकाला वाटते आहे.