पाकिस्तानमधील एका न्यायालयाने एका ख्रिश्चन व्यक्तीला समाजमाध्यमांवर ईशनिंदा करणारी पोस्ट शेअर केल्याप्रकरणी दोषी ठरवलं असून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. पंजाब प्रांतातील या आरोपीला कथित ईशनिंदा करणारी पोस्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्या पोस्टमुळे पंजाब प्रांतांत अनेक ठिकाणी जमावाने चर्च आणि अल्पसंख्याक ख्रिस्ती धर्मीयांच्या घरांवर हल्ले केले होते, तसेच ख्रिश्चनांची घरं जाळली होती. या व्यक्तीच्या पोस्टमुळे संतप्त जमावाने चर्च आणि ख्रिश्चन समुदायातील लोकांच्या घरांवर हल्ले केले. यात अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागला होता.

या पोस्टमुळे ख्रिश्चनांनी कुराणची कथित विटंबना केल्याची अफवा पसरली होती. पंजाब प्रांताची राजधानी लाहोरपासून १३० किलोमीटर दूरवर असलेल्या फैसलाबाद जिल्ह्यातील जरनवाला तालुक्यात मुस्लिमांच्या संतप्त जमावाने २४ चर्चना आग लावली, तसेच चर्च आणि आसपासच्या परिसरात नासधुस केली. यासह ख्रिश्चनांची ८० घरं पेटवली. या घटनेनंतर पोलिसांनी २०० मुस्लिमांना ताब्यात घेतलं होतं. मात्र त्यांच्यापैकी कोणावरही कारवाई झाली नाही. या २०० जणांपैकी १८८ जणांना न्यायालयाने पुराव्यांअभावी निर्दोष ठरवत मुक्त केलं आहे. तर उर्वरित १२ जण जामीनावर तुरुंगाबाहेर आले आहेत. त्यांच्यावर अद्याप खटला चालू आहे.

दहशतवादविरोधी प्रकरणांचे विशेष न्यायमूर्ती जैनुल्लाह खान यांनी शनिवारी अहसान राजा मसीह याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. यासह १० लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड देखील ठोठावला. मसीह याच्यावर दहशतवादविरोधी कायदा आणि इलेक्ट्रॉनिक गुन्हे प्रतिबंध कायद्याच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत तब्बल २२ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मसीहने टिकटॉकवर कथित ईशनिंदा करणारी पोस्ट शेअर केली होती. त्याच्या पोस्टमुळे मुस्लिमांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीच्या आधारावर मसीहविरोधात पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी कायदा आणि इलेक्ट्रॉनिक गुन्हे प्रतिबंध अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

हे ही वाचा >> मध्य प्रदेशात एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांचा गळफास, बुराडी सामूहिक आत्महत्या प्रकरणाची पुनरावृत्ती, तारीखही तीच

ऑल मायनॉरिटी अलायन्सचे अध्यक्ष अकमल भट्टी म्हणाले, या घटनेला आणि त्यानंतर ख्रिश्चनांच्या धार्मिक स्थळांवरील, त्यांच्या घरांवरील हल्ल्यांच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आलं आहे. मात्र जरनवाला भागात ख्रिश्चनांची धार्मिक स्थळे पेटवणाऱ्या, त्यांची नासधुस करणाऱ्या, ख्रिश्चनांची ८० हून अधिक घरं पेटवणाऱ्या, त्यांच्या घरांवर हल्ला करणाऱ्या एकाही व्यक्तीला शिक्षा झालेली नाही. केवळ १२ आरोपींवर खटला चालू आहे. परंतु, ते देखील जामीनावर मोकाट फिरत आहेत.

Story img Loader