अनेकदा शस्त्रसंधी आणि चर्चांच्या फेऱ्या होऊनही पाकिस्तानकडून अजूनही सीमाभागात आगळीक चालूच असते. आज एक पाकिस्तानी ड्रोन भारतीय हद्दीत घुसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीएसएफ अर्थात सीमा सुरशक्षा दलाच्या जवानांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे हे ड्रोन वेळीच खाली पाडण्यात यश आलं आहे. यासंदर्भात पीटीआयनं ट्वीट करून माहिती दिली आहे.
शुक्रवारी पहाटे २.३० च्या सुमारास अमृतसरमध्ये रेअर कक्कर भागात हे ड्रोन दिसून आलं. बीएसएफच्या जवानांना हे ड्रोन दिसताच त्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. ड्रोन कोसळल्यानंतर सकाळच्या सुमारास ते शोधून काढण्यात बीएसएफला यश आलं. सीमारेषेवरील भारताच्या बाजूचं तारेचं कुंपण आणि झिरो लाईनच्या मध्ये हे ड्रोन पडलेलं होतं. यामध्ये काही संशयित वस्तू आढळल्याची माहिती बीएसएफकडून देण्यात आली असून त्याची तपासणी केली जात आहे.
या भागात ड्रोनचे आणखीन काही हिस्से पडले असतील, तर त्यांचा शोध घेण्याचं काम चालू असल्याची माहिती बीएसएफकडून देण्यात आली आहे.