अमृतसर ; सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) महिला पथकाने पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यात पाकिस्तानी हद्दीतून भारतीय हद्दीत आलेले ड्रोन पाडून अमली पदार्थाच्या
तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला. तीन किलो अमली पदार्थ घेऊन भारतात येत असलेल्या या ‘ड्रोन’वर या पथकाने गोळीबार केला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री अमृतसर शहराच्या उत्तरेकडील चाहरपूर गावाजवळ पाकिस्तानचे ‘ड्रोन’ भारतीय हद्दीत घुसल्याचे ‘बीएसएफ’च्या पथकास समजले. ‘बीएसएफ’च्या ७३ बटालियनच्या दोन महिला हवालदारांनी या ‘ड्रोन’वर २५ फैरी झाडल्या. रात्री ११ वाजून पाच मिनिटांनी हे ‘ड्रोन’ कोसळले.
दुपारी शोध मोहिमेदरम्यान, ‘बीएसएफ’ने हे कोसळलेले ‘ड्रोन’ सापडले. १८ किलो वजनाच्या या ड्रोनमध्ये ३.११ किलो अमली पदार्थ खाली जोडलेल्या पांढऱ्या पॉलिथिनमध्ये गुंडाळलेले होते. गेल्या शुक्रवारी ‘बीएसएफ’ जवानांनी अमृतसरमध्ये सीमेजवळ अन्य एक पाकिस्तानी ‘ड्रोन’ही पाडले होते.