Pakistani Father Seeks Stay in India for Children’s Treatment : आपल्या दोन मुलांसाठी वैद्यकीय उपचारांसाठी भारतात आलेल्या एका पाकिस्तानी व्यक्तीने दोन्ही सरकारांना भारतात अधिक वेळ राहू देण्याची परवानगी मागितली आहे. पहलगामच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानी नागरिकांना २९ एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचे आदेश दिल्याने या पाकिस्तानी नागरिकाची अडचण निर्माण झाली आहे. सिंधमधील हैदराबाद येथील हे कुटुंब आहे.

मुळचे पाकिस्तानी असलेल्या दोन मुलांच्या वडिलांनी जिओ न्यूजशी फोनवर बोलताना सांगितले की, त्यांची ९ आणि ७ वर्षांची मुले जन्मजात हृदयरोगाने ग्रस्त आहेत. त्यांना हृदयविकार आहे आणि येथील प्रगत वैद्यकीय उपचारांमुळे त्यांच्यावर नवी दिल्लीत उपचार शक्य झाले. परंतु पहलगाम घटनेनंतर, आम्हाला ताबडतोब पाकिस्तानला परतण्यास सांगण्यात आले आहे.” पुढील आठवड्यात त्यांची शस्त्रक्रिया होणार आहे.

भारतात राहण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च

रुग्णालय आणि डॉक्टर कुटुंबाला सहकार्य करत आहेत, परंतु पोलीस आणि परराष्ट्र कार्यालयाने त्यांना तातडीने दिल्ली सोडण्यास सांगितले आहे, असे पीटीआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे. “मी सरकारला आवाहन करतो की त्यांनी माझ्या मुलांचे वैद्यकीय उपचार पूर्ण करण्याची परवानगी द्यावी. कारण आम्ही आमच्या प्रवासावर, राहण्यासाठी आणि त्यांच्या उपचारांवर सुमारे कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत”, असं त्या व्यक्तीने म्हटलं आहे.ॉ

दरम्यान, गुरुवारी पाकिस्तानमधील १०० हून अधिक भारतीय नागरिक भारतात परतले, असं वृत्त पीटीआयने दिलं आहे. शुक्रवारी, लाहोरजवळील वाघा सीमेवरून अधिक भारतीय नागरिक घरी परतले, तर अनेक पाकिस्तानी नागरिकही भारत सोडून गेले. अटारी-वाघा क्रॉसिंग भारतातील अमृतसरला पाकिस्तानातील लाहोरशी जोडते. सीमेवर असलेल्यांमध्ये बलुचिस्तानमधील सात सदस्यांचे पाकिस्तानी हिंदू कुटुंब होते, जे भारतात लग्नासाठी गेले होते.

अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना फोन

‘सार्क व्हिसा’ अंतर्गत भारतात आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना शोधून मुदत संपण्यापूर्वी त्यांची मायदेशी रवानगी करावी, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी सर्व राज्यांना केली. त्यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याला व्यक्तिगतरीत्या दूरध्वनी केला.

जलशक्ती मंत्रालयाची खलबते

भारताने सिंधू जलकरारास स्थगिती दिल्यानंतर कार्यवाही करण्यासाठी गुरुवारी जलशक्ती मंत्रालयाची महत्त्वाची बैठक झाली. गृहमंत्री अमित शहा यांनी बोलाविलेल्या या बैठकीला जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.