पाकिस्तानी गझल गायक उस्ताद गुलाम अली यांनी नवी दिल्लीमध्ये कार्यक्रम करण्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निमंत्रण स्वीकारले आहे. येत्या डिसेंबरमध्ये त्यांच्या गझल गायनाचा कार्यक्रम दिल्लीमध्ये होईल, असे स्वतः केजरीवाल यांनी शुक्रवारी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.
शिवसेनेने केलेल्या विरोधामुळे गुलाम अलींचा मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये आज होणारा कार्यक्रम आयोजकांनी रद्द केला. त्यानंतर पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्रामध्ये शनिवारी होणारा कार्यक्रमही रद्द करण्यात आला होता. हे दोन्ही कार्यक्रम रद्द झाल्यामुळे गुलाम अली यांनी नाराजी व्यक्त केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सरकारच्या वतीने गुलाम अलींना दिल्लीमध्ये कार्यक्रम घेण्याचे निमंत्रण दिले होते. ते त्यांनी स्वीकारले आहे.

शुक्रवारी केलेल्या ट्विटमध्ये केजरीवाल म्हणतात, गुलाम अली साहेब, आम्ही तुमचे खूप मोठे चाहते आहोत. तुमच्याशी बोलून खूप आनंद वाटला. त्याचबरोबर डिसेंबरमध्ये दिल्लीत कार्यक्रम घेण्याला होकार दिल्याबद्दल तुमचे खूप आभार.
दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते आशुतोष यांनी गुलाम अलींचे महाराष्ट्रातील कार्यक्रम रद्द होण्याचा तीव्र निषेध केला आहे. हा एका मोठ्या गायकाचा अपमान आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Story img Loader