चीनमध्ये नव्या पिढीच्या नेतृत्वाकडे सत्तांतरणाची प्रक्रिया सुरू असतानाच चीनचा पारंपरिक मित्र असलेल्या पाकिस्तानमधील माध्यमांमध्ये चीनविरोधी बातम्यांना ठळक प्रसिद्धी दिली जात आहे. ‘ग्लोबल टाइम्स’ या प्रमुख चिनी वृत्तपत्राने याबाबत पाकिस्तानी माध्यमांची खरडपट्टी काढली आहे. आपला जिवलग मित्र असलेल्या पाकिस्तानच्या वृत्तपत्रांवर टीका करणारा लेख चिनी वृत्तपत्रात प्रकाशित होणे ही एक दुर्मिळ घटना आहे.
कराचीमध्ये उभारण्यात येणाऱ्या चिनी प्रकल्पाच्या विरोधात नुकतीच निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांना पाकिस्तानी माध्यमांनी मोठय़ा प्रमाणात प्रसिद्धी दिली. त्याबद्दल ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये पाकिस्तानी विचारवंताने लिहिलेल्या लेखात ताशेरे ओढण्यात आले आहेत. सिंध प्रांतात चिनी प्रकल्पाच्या विरोधात नुकत्याच झालेल्या आंदोलनाला पाकिस्तानी माध्यमांनी अवास्तव प्रसिद्धी दिली. वास्तविक या आंदोलनात जेमतेम २०० लोकउपस्थित होते. तसेच एकही प्रभावशाली नेता या दरम्यान उपस्थित नव्हता. हे निव्वळ स्थानिक स्वरूपाचे फुटकळ आंदोलन असताना पाकिस्तानी माध्यमे केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी यास आंतरराष्ट्रीय वळण देण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा दावा या लेखात करण्यात आला आहे.
चीनतर्फे पाकिस्तानमध्ये विविध क्षेत्रांतील अनेक प्रकल्पांची निर्मिती सुरू आहे. पाकिस्तानी-चिनी नागरिकांमध्ये मित्रत्वाचे संबंध आहेत. चिनी नागरिकांमध्ये तर पाकिस्तान हे आपले दुसरे घर असल्याची भावना आहे. सिंध प्रांतात होणारे आंदोलन हे स्थानिक सरकारच्या विरोधात आहे. मात्र पाकिस्तानी पत्रकार या प्रकरणी चिनी कंपन्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप या लेखात करण्यात आला आहे. सिंधी राष्ट्रवाद्यांना अमेरिकी मदत कितपत मिळते याचीही तपासणी आवश्यक असल्याची गरज या लेखात व्यक्त करण्यात आली आहे.    

Story img Loader