“पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना धर्माच्या नावावर लक्ष्य केलं जात आहे आणि त्यांचं संरक्षण करण्यास देश अपयशी ठरला आहे”, अशी कबुली पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सोमवारी दिली. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
“अल्पसंख्याकांची दररोज हत्या केली जात आहे. पाकिस्तानमध्ये कोणताही धार्मिक अल्पसंख्याक सुरक्षित नाही. मुस्लिमांचे लहान पंथही सुरक्षित नाहीत”, असं ख्वाजा आसिफ म्हणाले. पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने ईशनिंदा आरोपांशी संबंधित मॉब लिंचिंगच्या अलीकडील घटनांचा निषेध करणारा ठराव मांडला. या हल्ल्यांना “चिंतेची आणि लाजिरवाणी बाब” म्हणत आसिफ यांनी अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी ठराव करण्याची मागणी केली. बऱ्याच पीडितांचा ईशनिंदा आरोपांशी संबंध नव्हता परंतु वैयक्तिक सूडबुद्धीमुळे त्यांना लक्ष्य केले गेले, असाही आरोप त्यांनी केला.
हेही वाचा >> Atishi Hunger Strike : दिल्लीच्या जलमंत्री आतिशी यांची प्रकृती खालावली, शुगर लेव्हल कमी झाल्याने रुग्णालयात दाखल!
“आपण आपल्या अल्पसंख्याक बांधवांच्या सुरक्षेची खात्री केली पाहिजे. त्यांना या देशात राहण्याचा तितकाच अधिकार आहे जितका बहुसंख्यांना आहे. पाकिस्तान सर्व पाकिस्तानी लोकांचा आहे, मग ते मुस्लिम, ख्रिश्चन, शीख किंवा इतर कोणत्याही धर्माचे असोत. आमची राज्यघटना अल्पसंख्याकांना पूर्ण संरक्षणाची हमी देते”, असे आसिफ यांनी म्हटल्याचं वृत्त डॉनने प्रसिद्ध केलं आहे.
मात्र, माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष असलेल्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ने जोरदार विरोध केल्यामुळे सरकार हा ठराव मांडू शकले नाही”, असे पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या सत्रादरम्यान ख्वाजा यांनी सांगितले. पाकिस्तानमधील ईशनिंदा कायदे जगातील सर्वात कठोर आहेत आणि देशातील धार्मिक अल्पसंख्याकांवर त्याचा गंभीर परिणाम आहे. पाकिस्तान दंड संहितेत अंतर्भूत असलेले हे कायदे, इस्लाम, प्रेषित मुहम्मद यांचा अपमान आणि कुराणाचा अपमान यांचा समावेश असलेल्या निंदेच्या विविध प्रकारांसाठी मृत्यूदंडासह कठोर शिक्षा देतात, असं इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटलं आहे.
ख्रिश्चन व्यक्तीला मारहाण करून घर जाळले
ख्रिश्चन, हिंदू आणि शीख यांच्यासह धार्मिक अल्पसंख्याकांना या कायद्यांतर्गत असमानतेने आरोपी आणि दोषी ठरवले जाते. मुस्लिमांमधील अल्पसंख्याक पंथ असलेल्या अहमदींनाही छळ सहन करावा लागतो कारण त्यांना पाकिस्तानच्या घटनेत मुस्लिम मानले जात नाही. २५ मे रोजी सरगोधा शहरात एका ख्रिश्चन व्यक्तीला मारहाण करण्यात आली आणि त्याचे घर जाळले गेले. हा छळ केवळ ईशनिंदेच्या आरोपापुरता मर्यादित नाही. हिंदू आणि शीख अल्पसंख्याकांना, विशेषतः सिंध प्रदेशात, सामाजिक भेदभावाचा सामना करावा लागतो आणि मुलींचे अनेकदा अपहरण केले जाते, जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतरित केले जाते आणि मुस्लिम पुरुषांशी लग्न केले जाते, असंही वृत्तात म्हटलं आहे.