Pakistani model Roma Michael: पाकिस्तान हे इस्लामी राष्ट्र असल्यामुळे तेथील महिलांनी हिजाब परिधान करावा, असा आग्रह धरण्यात येतो. महिलांच्या उदारीकरणाला पाकिस्तानमध्ये विरोध होत आला आहे. आधुनिक जीवनशैली आणि सोशल मीडियाचा वापर करत असल्यामुळे एका तरुणाने त्याच्याच कुटुंबातील चार महिलांची हत्या केल्याची घटना नुकतीच कराचीमध्ये घडली. त्यानंतर आता एका पाकिस्तानी मॉडेलला तेथील लोकांच्या पुराणमतवादी धोरणांना बळी पडावे लागले आहे. मिस ग्रँड इंटरनॅशनल २०२४ या स्पर्धेत बिकिनी घालून रॅम्प वॉक केल्यानंतर पाकिस्तानी मॉडेल रोमा मायकलवर टीका होऊ लागली आहे. या टीकेनंतर रोमा मायकलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सदर व्हिडीओ डिलीट केला. मात्र सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत असून पाकिस्तानवर टीका केली जात आहे.
रोमा मायकलला व्हिडीओ डिलीट करावा लागल्यानंतर ते सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागली आहे. पाकिस्तानमधील काही गटांनी तिच्या पेहरावावर आक्षेप घेतल्यानंतर इन्स्टाग्रावर पोस्ट केलेला बिकिनीवरील व्हिडीओ तिला डिलीट करावा लागला. यामुळे ती आता चर्चेत आली असून जगभरातून पाकिस्तानच्या पुराणमतवादी विचारसरणीवर टीका होऊ लागली आहे. तसेच तिचा बिकिनीवरील व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेकांनी म्हटले की, व्हिडीओ डिलीट करण्याशिवाय रोमाकडे कोणताही पर्याय नव्हता.
एक्सवरील एका युजरने म्हटले की, सोशल मीडियावर टीका होऊ लागल्यामुळे रोमाला व्हिडीओ डिलीट करावा लागला. याचाच अर्थ महिलांच्या पेहरावासंबंधी पाकिस्तानमध्ये किती बंधने आहेत, याची प्रचिती येते. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, सांस्कृतिक प्रतिनिधित्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यात पाकिस्तानचे नागरिक गफलत करत आहेत.
रोमा मायकल कोण आहे?
रोमा मायकल ही पाकिस्तानच्या लाहोरमधील असून ती एक व्यावसायिक मॉडेल आहे. दक्षिण आशिया विद्यापीठातून तिने बी.टेकची पदवी घेतली. सोशल मीडियावर कटेंट क्रिएटर म्हणून ती प्रसिद्ध आहे. रोमाने याआधी काही चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच पाकिस्तानमधील अनेक जाहिरातींमध्येही ती झळकलेली आहे.
मिस ग्रँड इंटरनॅशनल २०२४ या सौंदर्यवतींच्या स्पर्धेत तिने बिकिनीवर रॅम्प वॉक करतानाचा एक व्हिडीओ इन्स्टावर अपलोड केला होता. मात्र तिच्या पोस्टखाली पाकिस्तानमधील काही गटांनी तीव्र आक्षेप नोंदविला. पाकिस्तानच्या या अतिरेकी वृत्तीवर एका सोशल मीडियावरील व्यक्तीने खोचक प्रतिक्रिया दिली आहे. “नशीब, या सर्व प्रसंगानंतर ती अजून जिवंत आहे”, अशी उपरोधिक प्रतिक्रिया या व्यक्तीने केली आहे. मिस ग्रँड इंटरनॅशनलची अंतिम फेरी २५ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे.