सतत वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आलं आहे. पाकिस्तानमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले असताना त्यांनी पाकिस्तानमधील जनता ही भारतीयांचा बहुमूल्य ठेवा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“पाकिस्तानी लोक जशास तसे आहेत, हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. जर तुम्ही त्यांच्याशी मैत्रीपूर्ण भाव ठेवलात तर ते तुमचे मित्र होतात. तुम्ही त्यांच्याशी शत्रूत्त्व ठेवलं तर ते तुमचे शत्रू बनतील”, असं मणिशंकर अय्यर म्हणाले. अलहमरा येथील फैज महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी “हिज्र की रख, विसाल के फूल, भारत-पाकिस्तान मामले” सत्रादरम्यान ते बोलत होते.

ते म्हणाले की, “पाकिस्तानमधील जनतेने ज्याप्रमाणे स्वागत केलं, तसं स्वागत इतर कोणत्याही देशात झाले नाही.” ते जेव्हा कराचीमध्ये कॉन्सिल ऑफ जनरल म्हणून नियुक्त झाले होते तेव्हा त्यांची आणि त्यांच्या पत्नीची काळजी प्रत्येकाने घेतली होती, अशी आठवणही त्यांनी यावेळी शेअर केली. त्यांनी याबाबत Memories of A Maverick हे पुस्तक लिहिलंय. या पुस्तकात त्यांनी भारतीयांच्या कल्पनेपेक्षा वेगळा पाकिस्तान असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, सद्भावनेची गरज होती. परंतु, नरेंद्र मोदींचे सरकार स्थापन झाल्यापासून गेल्या १० वर्षांत सद्भावनेऐवजी उलट काहीतरी घडलं आहे.

“मी पाकिस्तानच्या लोकांना एवढंच सांगतो की, मोदींना कधीही एक तृतीयांशपेक्षा जास्त मते मिळाली नाहीत. पण आमची व्यवस्था अशी आहे की, जर एक तृतीयांश मते असतील तर त्यांच्याकडे दोन तृतीयांश जागा आहेत. त्यामुळे दोन तृतीयांश भारतीय तुमच्याकडे (पाकिस्तानी) येण्यास तयार आहेत”, असं अय्यर म्हणाले.

सर्जिकल स्ट्राईक करण्याचं धाडस

सहा वेगवेगळ्या पंतप्रधानांच्या नेतृत्त्वाखाली भारत-पाकिस्तान संबंधाबाबत भारतीय राजदूत सतींदर कुमार लांबा यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाचा उल्लेख करत मणिशंकर अय्यर म्हणाले, “इस्लामाबादमध्ये आतापर्यंत काँग्रेस सरकार आणि भाजपा सरकारमधील पाच भारतीय उच्चायुक्त झाले. त्या पाचही उच्चायुक्तांनी पाकिस्तानबरोबर संवाद सुरू ठेवण्याबाबत एकमताने सहमती दर्शवली होती. परंतु गेल्या १० वर्षात दोन्ही देशांत संवाद न होणे ही सर्वांत मोठी चूक आहे. तुमच्यावर सर्जिकल स्ट्राईक करण्याचे धाडस आमच्यात आहे, पण एकत्र बसून बोलण्याचे धाडस आमच्यात नाही”, असंही अय्यर म्हणाले.

तर काश्मीर आणि दहशतवाद्याच्या मुद्द्यावर चर्चा होईल

पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त शाहिद मलिक यांनी नमूद केले की, मणिशंकर अय्यर यांचा जन्म लाहोरमधील लक्ष्मी हवेलीमध्ये झाला होता. शांततेसाठी पुढाकार पाकिस्तानकडून आलाच पाहिजे या अय्यर यांच्या विधानावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, अलीकडेच पाकिस्तानने भारताला संवाद प्रक्रिया सुरू करण्याची सूचना केली होती. परंतु भारत सरकार तसे करण्यास टाळाटाळ करत आहे. २००८ साली ज्या ठिकाणी संवाद थांबला होता, तिथूनच पुन्हा संवाद सुरू करायला पाकिस्तानला आनंद होईल. या संवादातून काश्मीर आणि दहशवादासारख्या मुद्द्यांवरही चर्चा केली जाईल.

“आम्ही दहशतवादावर चर्चा करायला लाजत नाही. दहशतवादाच्या संदर्भात भारताबरोबर काही समस्या आहेत. काही मुद्द्यांवर मतभेद असले तरीही संवाद सुरू झाला पाहिजे. व्हिसा प्रक्रिया सुलभ करणे, दोन्ही देशांमधील व्यापार सुरळीत करणे या मार्गांनी आपण शांतता निर्माण करू शकतो”, असंही मलिक यांनी सुचवले.

काश्मीरबाबत काही प्रगती शक्य आहे का? असे विचारले असता, अय्यर म्हणाले की, मुशर्रफ राजवटीत काश्मीरमध्ये प्रचंड प्रगती झाली होती आणि मागच्या चर्चेदरम्यान आम्ही इतक्या चांगल्या टप्प्यावर पोहोचलो होतो की जेव्हाही काश्मीरचा मुद्दा पुन्हा उचलला जाईल तेव्हा आम्ही काही ठिकाणी पोहोचू.”

भारतातील हिंदुत्ववादी संघटना पाकिस्तानशी चर्चा करू इच्छितात, ही चर्चा मूर्खपणाची असल्याचंही अय्यर म्हणाले. “इस्लामिक प्रजासत्ताक बनलेल्या पाकिस्तानचे अनुकरण करण्याचा प्रयत्न भारतातील हिंदुत्त्ववादी संघटना करत आहेत. परंतु, इस्लामिक प्रजासत्ताक गांधी-नेहरूंनी नाकारले होते. धर्मावर आधारित प्रजासत्ताक न बनवता सर्व धर्मांवर आधारित प्रजासत्ताक बनेल, अशी भूमिका गांधी-नेहरूंनी स्पष्ट केली होती. पण ६५ वर्षे टिकलेले त्यांचे तत्वज्ञान २०१४ मध्ये उखडून टाकण्यात आले”, असंही अय्यर म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani people are biggest indian asset says mani shankar ayyer in pakistan sgk