बंदी घालण्यात आलेल्या पाकिस्तानी तालिबानसमवेत शांतता चर्चेला त्वरित सुरुवात करावी, असा आदेश पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी शुक्रवारी चार सदस्यीय समितीला दिला.पाकिस्तान तालिबानशी चर्चा करण्यासाठी शरीफ यांनी अलीकडेच एक समिती स्थापन केली आहे. चर्चेद्वारे शांतता प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट गाठावे, अशी इच्छा शरीफ यांनी समितीशी चर्चा करताना व्यक्त केली. चर्चेच्या प्रक्रियेत जे गट अथवा समूह सहभागी होण्यास तयार आहेत, त्यांच्याशी समितीने त्वरित संपर्क साधावा, असेही शरीफ यांनी म्हटले आहे.
या समितीला चर्चेचे संपूर्ण अधिकार देण्यात आले असून पाकिस्तानचे अंतर्गतमंत्री चौधरी निसार अली खान यांनी समितीला आवश्यक ती सर्व माहिती आणि स्रोत उपलब्ध करून द्यावे, असे शरीफ यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ पत्रकार इरफान सिद्दीकी आणि रहिमुल्लाह युसुफझाई, माजी राजकीय मुत्सद्दी रुस्तम शहा मोहम्मद आणि आयएसआयचा माजी अधिकारी मोहम्मद आमिर यांचा समितीमध्ये समावेश असून सिद्दीकी त्या समितीचे निमंत्रक आहेत.
तालिबान्यांकडून सातत्याने होणारे हल्ले पाहता लष्कराला त्यांच्याविरुद्ध धडक मोहीम हाती घेण्याचे आदेश देण्यात येतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत असतानाच शरीफ यांनी राष्ट्रीय असेंब्लीत समिती स्थापनेची घोषणा करून सर्वानाच धक्का दिला.
तालिबान्यांशी शांतता चर्चा सुरू करण्याचे शरीफ यांचे आदेश
बंदी घालण्यात आलेल्या पाकिस्तानी तालिबानसमवेत शांतता चर्चेला त्वरित सुरुवात करावी, असा आदेश पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी शुक्रवारी चार सदस्यीय समितीला दिला.
First published on: 01-02-2014 at 02:27 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani premier forms group to start talks with taliban