भारत आपल्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘अमृत महोत्सव’ साजरा करत आहे. दरम्यान, पाकिस्तानातून व्हायरल झालेल्या रबाब वादक कलाकाराच्या व्हिडिओने भारतीयांची मने जिंकली आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये पाकिस्तानी कलाकार सियाल खान रबाब वाद्याच्या माध्यमातून भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ ची धून वाजवून भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सीमेपलीकडील प्रेक्षकांना माझ्याकडून भेट’ असं लिहित सियाल यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्वीटरवर शेअर केला आहे. ट्वीटरवर आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याचबरोबर ५० हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. रबाब हे वीणासारखे दिसणारे तंतुवाद्य आहे. हे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि काश्मीरमध्ये खूप लोकप्रिय आहे.
दोन्ही देशांच्या लोकांकडून कौतुक
सियाल यांनी भारतातील जनतेला स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही देशांमधील चांगले संबंध, मैत्री आणि सद्भावना यासाठी मी भारताचे राष्ट्रगीत वाजवण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी म्हणले आहे. दुसरीकडे, भारत आणि पाकिस्तानच्या लोकांनी या धूनचे कौतुक केले आहे.
हेही वाचा- Independence Day 2022: भारतीय लष्कर, हवाईदल आणि नौदलाकडून स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
पश्तून, बलुच आणि सिंधी लोकांमध्ये रबाब वाद्य लोकप्रिय
रबाब हे वाद्य अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संगीताचा एक महत्त्वाचा भाग आहे. पाकिस्तानातील पश्तून, बलुच आणि सिंधी लोकांच्या संस्कृतीतही हे खूप लोकप्रिय आहे. सियाल खानच्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध माहितीनुसार, ते पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामधील दीर भागाचे रहिवासी आहे. ते राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाकिस्तानची सुंदर दृश्ये पाहू शकता आणि रबाबवरील सुंदर सूर ऐकू शकता, असे सियालने म्हटले आहे.