जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्य़ातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या सैन्याने हल्ला चढवून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. मात्र भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या या आगळिकीला सडेतोड जबाब दिला.
पूंछ जिल्ह्य़ाच्या बानवत क्षेत्रात पाकिस्तानच्या सैन्याने गोळीबार केला. तेव्हा भारतीय सीमेवर तयारीत असलेल्या भारतीय जवानांनी त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले. या चकमकीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
गुरुवारी रात्री पाकिस्तानच्या रेंजर्सनी कथुआ जिल्ह्य़ातील हिरानगर येथे गोळीबार केला होता. अल्पावधीसाठी हा हल्ला थांबविण्यात आला असला तरी पाकिस्तानने शनिवारी पुन्हा एकदा आगळीक केली.
आंतरराष्ट्रीय सीमेवर १ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आलेल्या गोळीबारात आठ जण ठार, तर ९० जण जखमी झाले असून त्यामध्ये १३ सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. पाकिस्तानकडून ३६ हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे.
दरम्यान, पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांच्या शरीरात घुसलेले काही घटक बाहेर काढणे शक्य नसल्याने त्यांना शरीरातील त्या घटकांसहच आयुष्य घालवावे लागण्याची शक्यता आहे.

Story img Loader