उत्तर वझिरिस्तानात पाकिस्तानी तालिबानी आणि अल काईदाच्या अतिरेक्यांचे आश्रयस्थान असलेल्या भागात बुधवारी सकाळी अमेरिकेच्या ड्रोन विमानांनी केलेल्या हल्ल्यात सात जण ठार झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात उत्तर वझिरिस्तानातील पाकिस्तानी तालिबानींचा दुसऱ्या क्रमांकाचा कमांडर वली-उर-रेहमान मारला गेला असल्याचे तीन सुरक्षारक्षकांनी म्हटले आहे.
पाकिस्तानात ११ मे रोजी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अमेरिकेकडून या भागात करण्यात येणारे वैमानिकरहित ड्रोनहल्ले हा महत्त्वाचा मुद्दा होता. या निवडणुकीनंतर या भागात करण्यात आलेला हा पहिला ड्रोनहल्ला असून यात वली-उर-रेहमानसह सात जण मारले गेले आहेत.
पाकिस्तानी तालिबान ही अतिरेक्यांची संघटना अफगाण तालिबानचाच एक भाग आहे. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान नावाने ही संघटना या भागात ओळखली जाते. या संघटनेने पाकिस्तानी लष्कर तसेच नागरिकांवर आतापर्यंत अनेक हल्ले केले आहेत.
हकिमुल्ला मेहसूदनंतर या भागातील म्होरक्या म्हणून वली-उर-रेहमानकडे पाहिले जात होते. बुधवारी करण्यात आलेल्या हल्ल्यात तो मारला गेल्याचे सुरक्षा दलातील सूत्रांनी म्हटले आहे. मात्र पाकिस्तानी तालिबानचा प्रवक्ता इहसानुल्लाह इहसान याने एका वृत्तसंस्थेशी बोलताना वलीच्या हत्येची खातरजमा अद्याप करण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले आहे. या हल्ल्याबाबत अधिक माहिती देण्यासही त्याने स्पष्ट शब्दांत नकार दिला.
मिरानशाह येथील चष्मा पूल भागात असलेल्या एका घरावर बुधवारी सकाळी वैमानिकरहित विमानांतून दोन क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या हल्ल्यात या घरातील सात जण ठार झाल्याची माहिती दूरचित्रवाणी वाहिनीने अधिकृत सूत्रांचा हवाला देत दिली आहे. हा हल्ला खरा असल्यास पाकिस्तानी लष्कराने अमेरिकेचे आभार मानावेत, असे तालिबान्यांसंबंधातील पाकिस्तानातील अभ्यासक सलीम सफी यांनी म्हटले आहे.
एखाद्या संशयित अतिरेक्याला जवळून हल्ला करून पकडणे शक्य नसते व त्याचबरोबर अशा ठिकाणी हल्ला केला असता सामान्य नागरिक त्यात मारले जाणार नाहीत, याची खात्री असते, केवळ अशा परिस्थितीतच हल्ला करण्याचे हे धोरण आहे.
पाकिस्तानकडून निषेध
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी ड्रोनहल्ल्यासंदर्भात नव्याने निश्चित केलेल्या धोरणानंतर करण्यात आलेला पहिला हल्ला हा ‘बेकायदा आणि निष्फळ’ असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने नोंदविली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव जलिल अब्बास जिलानी यांनी कुठलाही ड्रोनहल्ला हा पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावरील हल्ला आहे, असे म्हटले आहे.

Story img Loader