सरकारवर विश्वास नसल्याचा दावा
पाकिस्तान सरकारसमवेत कोणत्याही प्रकारची बोलणी करण्यास स्पष्टपणे नकार देत सूड घेण्याच्या हेतूने हल्ले करण्याची उघड धमकी पाकिस्तानी तालिबानचा प्रमुख मुल्ला फाझलउल्ला याने दिली आहे.
तेहरिक-ए-तालिबान या संघटनेचा प्रमुख हकीमुल्ला मेहसूद हा अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेल्यानंतर ‘तेहरिक’ कडून मोठय़ा प्रमाणावर हल्ले घडवून आणले जाण्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी पाकिस्तान सरकारला दिला आहे. पंजाब प्रांतात स्थापन करण्यात आलेली सरकारी कार्यालये तसेच सुरक्षा दलांच्या कार्यालयांवर हे हल्ले केले जाण्याची दाट शक्यता आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा हा प्रांत ओळखला जातो. त्यांच्या कुटुंबाचे वास्तव्यही तेथेच असते.
तालिबान्यांनी यापूर्वी सरकारसमवेत अनेकदा अर्थपूर्ण चर्चेचे प्रयत्न केले परंतु सरकारने फसवणूक केल्यामुळे यापुढे त्यांच्याशी कोणतीही चर्चा करायची नाही, असा निर्णय घेण्यात आल्याचे ‘तेहरिक’चा प्रवक्ता शाहिदुल्ला शाहीद याने सांगितले. यासंबंधीचे वृत्त ‘द न्यूज डेली’ ने दिले आहे. शांतता चर्चेच्या नावाखाली आमची फसवणूक करण्याची संधी आम्ही यापुढे सरकारला कदापि देणार नाही. सरकारशी निष्फळ चर्चा करून काहीही साध्य होणार नाही. हे सरकार अमेरिकेच्या हातचे बाहुले आहे, या शब्दांत शाहीद याने तोफ डागली. मेहसूद याला ठार मारण्यासाठी सीआयएने घडवून आणलेल्या कारवाईत पाकिस्तानी सरकारचाच हात असल्याचा तेहरिकला पक्का संशय आहे.
पाकिस्तानी तालिबान हल्ले करण्याच्या बेतात
सरकारवर विश्वास नसल्याचा दावा पाकिस्तान सरकारसमवेत कोणत्याही प्रकारची बोलणी करण्यास स्पष्टपणे नकार देत सूड घेण्याच्या हेतूने हल्ले करण्याची उघड धमकी पाकिस्तानी तालिबानचा प्रमुख मुल्ला फाझलउल्ला याने दिली आहे.
First published on: 09-11-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani taliban in plan to attack