पाकिस्तानातील तालिबान्यांनी स्फोटके तयार करताना त्यामध्ये विषारी रसायन वापरण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केल्यामुळे दहशतवादाचा मुकाबला करणाऱयांपुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. पाकिस्तानाती ‘डॉन’ या वृत्तपत्राने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
पाकिस्तानमध्ये तालिबान्यांनी घडवून आणलेल्या स्फोटामध्ये जखमी झालेल्या पीडितांवर उपचार करणाऱया डॉक्टरांनी या विषारी रसायनांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. स्फोटकांमध्ये विषारी रसायने वापरण्यात आल्यामुळे पीडितांवर उपचार करताना गुंतागुतींचे प्रश्न निर्माण होतात. हल्ल्यातील पीडितांना गंभीर जखमा होतात. त्याचबरोबर इतरवेळी ज्या प्रतिजैविकांमुळे रुग्णांना दिलासा मिळतो. ती औषधे अशा स्वरूपाच्या जखमांवर उपचार करण्यात निरुपयोगी ठरतात, असेही डॉक्टरांच्या लक्षात आल्याचे या वृत्तामध्ये म्हटले आहे. विषारी रसायनांमुळे पीडितांना अत्यंत वेदनादायी जखमा होतातच, त्याचबरोबर त्याचे व्रण आयुष्यभर राहू शकतात.
काही तालिबानी स्फोट घडवून आणण्यासाठी स्फोटकांमध्ये फॉस्फरसचा वापर करतात. त्यामुळे मानवी पेशी मरतात, असेही एका वैद्यकीय अधिकाऱयाने सांगितल्याचे वृत्तामध्ये म्हटले आहे.