बोस्टन येथील मॅरेथॉनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात हात असल्याच्या वृत्ताचा पाकिस्तानी तालिबानने स्पष्ट इन्कार केला आहे. पाकिस्तानच्या वायव्य प्रांतातील वार्ताहरांशी संपर्क साधून तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानचा प्रवक्ता एहसानउल्लाह एहसान याने बोस्टन स्फोटात हात असल्याचा इन्कार केला.
अमेरिका आणि त्यांच्या मित्रदेशांवर हल्ले करण्यास तालिबान वचनबद्ध आहे, मात्र बोस्टन येथील बॉम्बस्फोटात आमचा हात नाही. जेव्हा शक्य असेल तेव्हा अमेरिकेवर हल्ला केला जाईल, असेही एहसान याने वार्ताहरांना सांगितले. बंदी घालण्यात आलेल्या सदर संघटनेने २०१० मध्ये न्यूयॉर्कच्या टाइम्स स्वेअरमध्ये गाडीत बॉम्बस्फोट घडवून आणला होता आणि त्याची जबाबदारी स्वीकारली होती. फैझल शहझाद याने हा स्फोट घडवून आणला होता आणि पाकिस्तानी तालिबानने आपल्याला प्रशिक्षण दिल्याचेही त्याने मान्य केले होते.
दरम्यान, पाकिस्तान सरकारने बोस्टन येथील बॉम्बस्फोटाचा निषेध केला आहे. या स्फोटामुळे पाकिस्तान सरकार आणि तेथील जनतेला तीव्र दु:ख झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे.

Story img Loader