जम्मू काश्मीरमधील अखनूर येथे घुसखोरी करताना जीवंत पकडल्या गेलेल्या अब्दुल कयूम या दहशतवाद्याने पाकिस्तानी सैन्याकडूनच दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले होते अशी कबुली दिली आहे. लष्कर ए तोयबासाठी निधी गोळा करणे आणि दहशतवाद्यांची भरती करण्यासाठी भारतात आल्याचे त्याने सांगितले आहे.
भारताच्या सीमा सुरक्षा दलाने शुक्रवारी अखनूर येथून अब्दुल कयूममला अटक केली होती. सीमा रेषेवर सतर्कतेचा इशारा देणारा अलार्म वाजला आणि त्यामुळे चारही दहशतवादी पळाले. यातील एक दहशतवादी अब्दूल कयूमला वीजेचा शॉक लागला आणि तो बेशुद्ध झाला. यानंतर बीएसएफच्या जवानांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून एक मोबाईल आणि दोन सिम कार्डही जप्त करण्यात आले. बीएसएफने कयूमची कसून चौकशी केला असता त्याने पाकिस्तानचे नापाक इरादे उघड केले. कयूमने हाफिज सईदला ओळखत असल्याचे सांगितले. लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी आत्तापर्यंत ५० लाख रुपये गोळा केल्याचे त्याने सांगितले.
३५ वर्षाचा कयूम हा पाकिस्तानमधील सियालकोटचा रहिवासी आहे. १२ वी पर्यंत शिकलेला कयूम हा १६ व्या वर्षांपासून कट्टरतावादाकडे झुकला. यानंतर दहशतवाद्यांशी त्याचा संपर्क आला. दहशतवादी संघटनेत भरती होण्यासाठी तरुणांचे ब्रेनवॉश करण्याचे कामही तो करत होता. कयूमला चार वर्षाची मुलगी आणि दोन वर्षाचा मुलगा असून त्याच्या नावावर तब्बल ३५ एकरची जमीन असल्याचे त्याने सुरक्षा यंत्रणांना सांगितले.
दरम्यान, जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधीत दोघा जणांना सैन्याने शनिवारी अटक केली आहे. एहसान कुर्शीद आणि फैजल हुसैन अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही पाकव्याप्त काश्मीरचे रहिवासी असून दहशतवाद्यांना भारतापर्यंतचा रस्ता दाखवण्याचा काम हे दोघे करत होते. हे दोघेही अल्पवयीन असून दोन वर्षांपासून ते जैश ए मोहम्मदसाठी काम करत असल्याचे समोर आले आहे. या दोघांना जम्मूत सीमारेषेजवळील एका भारतीय चौकीजवळ अटक करण्यात आली.